दिव्यांगांना स्कूटरसाठी पालिका देणार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:15 AM2017-11-22T02:15:14+5:302017-11-22T02:15:23+5:30

मुंबई : दिव्यांगांना तीनचाकी स्कुटर घेण्यासाठी महापालिका अनुदान देणार आहे.

Grant to municipal corporation for scooters | दिव्यांगांना स्कूटरसाठी पालिका देणार अनुदान

दिव्यांगांना स्कूटरसाठी पालिका देणार अनुदान

Next

मुंबई : दिव्यांगांना तीनचाकी स्कुटर घेण्यासाठी महापालिका अनुदान देणार आहे. स्कूटरच्या किमतीची ७५ टक्के रक्कम अथवा ५६ हजार रुपये आर्थिक मदत दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याचा लाभ मुंबईतील सुमारे एक हजार ७१ पात्र दिव्यांगांना मिळणार आहे.
महापालिकेतर्फे जेंडर बजेटच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना बेस्ट बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर आता दिव्यांगांना मुंबईत सहज व सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी लवकरच तीन चाकी स्कुटर देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला आहे. महापालिकेने त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात सहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र या स्कुटरचा लाभ घेण्यासाठी संबंधित दिव्यांग व्यक्तीला स्वत: च्या खर्चाने तीनचाकी स्कुटर खरेदी करावी लागेल. या स्कुटर खरेदीची पावती पालिकेच्या संबंधित खात्याच्या अधिकाºयाकडे जमा करावी लागेल. त्यानंतर संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या बँक खात्यात त्या स्कुटरची रक्कम जमा करण्यात येणार आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर अथवा प्रभाग कार्यालयात यासाठी अर्ज घेता येईल. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र लाभार्थी निश्चित करणार आहे.
असे असतील निकष
दिव्यांग व्यक्ती मुंबईची रहिवासी असावी, ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र धारक आणि १८-६० वय असणे आवश्यक आहे.
दिव्यांग व्यक्तीकडे स्कुटर चालविण्याचा परवाना असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये अथवा त्यापेक्षा कमी असावे.
शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम, खासगी आस्थापनेवर कायम नोकरीत नसलेल्या व्यक्ती असाव्या.
आधार कार्ड आवश्यक असून वाहनाचा वापर स्वत:च करणार असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.

Web Title: Grant to municipal corporation for scooters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.