जीएसटी अधीक्षकांची आत्महत्या; 30 व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 10:31 AM2019-05-14T10:31:47+5:302019-05-14T10:32:34+5:30
सततच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या
मुंबई: जीएसटी अधीक्षक हरेंद्र कपाडिया यांनी कफ परेडमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 30 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. आजारापणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
51 वर्षांच्या हरेंद्र कपाडिया यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 30 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. यानंतर त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 'कपाडिया सततच्या आजारपणाला कंटाळले होतं. त्यांना आठ ते दहा महिन्यांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती,' अशी माहिती पोलिसांनी दिली.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर कपाडिया यांनी पुन्हा काम सुरू केलं. तीन महिन्यांपूर्वी ते कार्यालयात रूजू झाले. पण त्यांना स्मृतीभ्रंश झाला. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिकचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कार्यालयात हजर असलेल्या दोघांचा जबाब घेतला आहे.