हर्षवर्धन पाटील प्रचंड आशावादी, शरद पवारांवर टीका करणार नाही, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 08:33 PM2019-10-23T20:33:08+5:302019-10-23T20:34:12+5:30
शरद पवारांच्या झंझावती दौऱ्याबाबतही हर्षवर्धन पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं.
मुंबई - आम्ही मेहनत घेतलीय, कार्यकर्त्यांनी धावपळ केलीय. त्यामुळे, आम्हाला विश्वास आहे. मतदारराजाने योग्य तो निर्णय घेतला असेल असेच आम्हाला वाटते, असे म्हणत विजयाची अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखवला. युवकांचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांनी गेल्या 5 वर्षात केलेलं काम आणि नरेंद्र मोदींचा प्रभाव, यामुळे जनता भाजपाच्या पाठिशी राहिल. उद्याच्या निकालाची कसलिही चिंता नसल्याचा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवारांच्या झंझावती दौऱ्याबाबतही हर्षवर्धन पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं. पवारसाहेबांबद्दल मला आदर असून ते ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून आम्हाला चांगली वागणूक मिळाली नाही, असे म्हणत नाव न घेता अजित पवार आणि सुप्रिया सुळेंकडे हर्षनवर्धन पाटील यांनी इशारा केला आहे. तसेच, राज्यात महायुतीचे सरकार येईल, असा आशावादही हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखवला.
हर्षवर्धन पाटील यांनी ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला बाय करत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, इंदापूर मतदारसंघातून भाजपाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांचे कडवे आव्हान होते. भरणे यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांनीही इंदापूर मतदारसंघात सभा घेतली. त्यावेळी, हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकाही पवारांनी केली होती. मात्र, मला पवार यांच्यावर कुठलिही टीका करायची नसल्याचं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मला आदर आहे, असेही पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.