उष्णतेची लाट : पुढच्या ४ ते ५ दिवसांत कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढणार
By सचिन लुंगसे | Published: April 25, 2024 06:10 PM2024-04-25T18:10:48+5:302024-04-25T18:11:41+5:30
मुंबईचे कमाल तापमान ३८ च्या आसपास तर राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार नोंदविले जाईल.
मुंबई : आखाती देशातून गुजरातमार्गे मुंबईसह राज्यात वाहणा-या उष्ण वा-यामुळे पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट येईल; आणि कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशानी अधिक नोंदविले जाईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. त्यानुसार, मुंबईचे कमाल तापमान ३८ च्या आसपास तर राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार नोंदविले जाईल.
हवामानातील बदलामुळे कमाल तापमानाचा पारा वाढतो आहे. तीन दिवस उष्णतेच्या लाटेच्या झळा बसतील. मुंबईचे कमाल तापमान ३८ च्या आसपास नोंदविले जाईल. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
राज्यात व मध्य भारतात काही ठिकाणी पुढच्या ४ ते ५ दिवसांत कमाल तापमान ३ ते ४ अंशाची वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे. - डाॅ. कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, पुणे, भारतीय हवामान विभाग
इराण, अफगाणिस्तान, दक्षिण पाकिस्तानातून गुजरात मार्गे येणाऱ्या उष्णतेच्या लोटामुळे मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेची स्थिती शनिवार ते सोमवार राहील. मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यात दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
कोणत्या वर्षी किती तापमान
दिनांक (एप्रिल) / वर्ष/ कमाल तापमान
१ / २०११ / ३७.३
१६ / २०१२ / ३८
२८ / २०१३ / ३७.३
२२ / २०१४ / ३९
२२ / २०१५ / ३५.३
२८ / २०१६ / ३८
१९ / २०१७ / ३६
१७ / २०१८ / ३७.७
१४ / २०१९ / ३६.३
२१ / २०२० / ३७.८
७ / २०११ / ३५.८