भुयारी मार्गाच्या कामाला स्थगितीस हायकोर्टाचा नकार, मेट्रो-३ प्रकल्प, आयआयटीच्या तज्ज्ञांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:53 AM2017-09-15T06:53:26+5:302017-09-15T06:53:57+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या प्रस्तावित मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या कामाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मात्र मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे व ड्रिलिंगमुळे दक्षिण मुंबईतील जागतिक वारसाचा दर्जा असलेल्या इमारतींच्या पायावर काय परिणाम होणार आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या प्रस्तावित मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या कामाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मात्र मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे व ड्रिलिंगमुळे दक्षिण मुंबईतील जागतिक वारसाचा दर्जा असलेल्या इमारतींच्या पायावर काय परिणाम होणार आहे, हे जाणण्यासाठी आयआयटी-मुंबईच्या तज्ज्ञांची नियुक्ती करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रस्तावित मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या कामामुळे जागतिक वारसा असलेल्या जे. एन. पेटीट संस्थेच्या ११९ वर्षे जुन्या इमारतीला हानी पोहोचत असल्याचा दावा करत जे. एन. पेटीट संस्थेच्या विश्वस्तांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होती.
हुतात्मा चौक येथे मेट्रो-३च्या स्टेशनचे बांधकाम सुरू असल्याने जे. एन. पेटीट व या परिसरात असलेल्या अन्य जागतिक वारसा लाभलेल्या इमारतींच्या पायाला हानी पोहोचत असल्याचे विश्वस्तांनी याचिकेत म्हटले आहे.
न्यायालय मेट्रो-३चे काम थांबवू शकत नाही. परंतु याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊ. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या सर्वेक्षणाचे काम आआयटी-मुंबईकडे सोपविले आहे आणि त्यांनाच अन्य इमारतींच्या सर्वेक्षणाचे काम करण्यास सांगू,’ असे न्यायालयाने म्हटले.
‘आम्हाला नागरिकांच्या सुरक्षेची चिंता आहे. मात्र मेट्रोचे काम थांबविणे, हा पर्याय नाही. कारण हा प्रकल्प नागरिकांच्या कल्याणासाठीच राबविण्यात येत आहे,’ असे म्हणत न्यायालयाने मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या बांधकामाला स्थगिती देण्यास नकार दिला.
दरम्यान, उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला मेट्रोच्या कामासाठी अंधेरी (पूर्व) आणि दहिसर (पूर्व) येथील एकूण २१६ झाडे कापण्याची परवानगी दिली.
काय म्हटले आहे याचिकेत
याचिकेनुसार, २५ आॅगस्ट रोजी जे.एन. पेटीट इमारतीचे सिलिंग कोसळले. मेट्रो-३ चे काम सुरू असल्याने इमारतीला सतत कंपने बसत आहेत आणि याचमुळे इमारतीचे सिलिंग कोसळले आहे. ‘आम्ही मेट्रो-३ च्या कामाला विरोध करत नाही. मात्र जागतिक वारसा लाभलेल्या इमारतींवर या कामाचा काय परिणाम होणार आहे, याचा अहवाल मिळत नाही, तोपर्यंत हे काम थांबविण्यात यावे,’ अशी विनंती जे. एन. पेटीटच्या विश्वस्तांनी न्यायालयाला केली.