ऐतिहासिक ट्रेक : पन्हाळगड, पावनखिंड ते विशालगड पदभ्रमण मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2017 09:08 PM2017-06-16T21:08:42+5:302017-06-16T21:31:10+5:30
पावसाचे दिवस सुरू झाले की विक-एन्ड आणि ट्रेक हे प्लॅनिंग हमखास होतंच. भटकंतीची आवड असणारे आपले वाटाडे मित्र-मैत्रिणी आर्वजून पावसाळी ट्रेकचं नियोजन करतात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - पावसाचे दिवस सुरू झाले की विक-एन्ड आणि ट्रेक हे प्लॅनिंग हमखास होतंच. भटकंतीची आवड असणारे आपले वाटाडे मित्र-मैत्रिणी आर्वजून पावसाळी ट्रेकचं नियोजन करतात. आतापर्यंत तुम्ही धम्माल पावसाळी ट्रेकिंग केलं असेलच. पण ऐतिहासिक ट्रेक केलंय का? नाही म्हणता. तर मुंबईतील शिवशौर्य ट्रेकर्सतर्फे "पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड" पदभ्रमण मोहीम अजिबात चुकवू नका.
साहस, निसर्ग आणि ऐतिहासिक घटना, ठिकाणांचे याची देही याची डोळा अनुभव घेऊ शकाल शिवाय, मोठ्या प्रमाणात आपल्या महाराजांच्या शौर्याची माहिती यानिमित्तानं नक्कीच गाठीशी बांधून घ्याल, यात काही शंका नाही.
छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्य़ातून आषाढाच्या भरपावसात ज्या दिवशी, ज्या वेळी, ज्या मार्गाने आपल्या निवडक साथीदारांसह निसटले, त्याच मार्गाने सर्वसामान्य माणसांनी जाऊन आपल्या या इतिहासाची त्याच थरारक वातावरणात अनुभूती घ्यावी म्हणून "शिवशौर्य ट्रेकर्स" संस्था गेली अनेक वर्षे या ऐतिहासिक मोहिमेचे आयोजन करत आले आहेत. यंदा 7 जुलै ते 10 जुलै या दरम्यान ही ऐतिहासिक ट्रेक आयोजित करण्यात आली आहे.
355 वर्षांपूर्वी आषाढ अमावस्येला शिवाजी महाराज हे पन्हाळगड्याच्या वेढ्यातून निसटून विशालगडाकडे गेले होते. अरुंद अशा घोडखिंडीत (पुढे पावनखिंड) बाजीप्रभू देशपांडे यांनी आदिलशाही फौजेशी दोन हात केले होते. त्यात बाजींना वीरमरण आले. पण शिवराय बचावले. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी या ऐतिहासिक ट्रेकचं आयोजन केले जाते. तरुण पिढीला शिवरायांचे कार्य व हिंदवी स्वराज्यासाठी शहीद झालेल्या वीरांची माहिती कळावी, असा शिवशौर्य ट्रेकर्सचा उद्देश आहे.
निसर्गवेड्या माणसाला स्वतःचा विसर पडावा अशी निसर्गाची विविध रुपे तुम्हाला या ट्रेकच्या माध्यमातून अनुभवायला मिळतील. अनेक आयुर्वेदिक पाना-फुलातून, मूळ-खोडातून खळखळ वाहणारे पाणी अमृताहून सरस आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही मोहीम पूर्ण केल्यानंतर ट्रेकर्संना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरवही करण्यात येतो.
कसं असणार या ट्रेकचं स्वरुप?
"पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड"...ऐतिहासिक ट्रेक
शुक्रवार दि.7 जुलै 2017 सकाळी 7 वा. पन्हाळगडावर आगमन आणि गडावरच मुक्काम. इत्यंभूत माहितीसह पन्हाळगड दर्शन आणि पन्हाळगडाच्या शेजारी असलेला पावनगड दर्शन. सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जमलेल्या सर्व शिव प्रेमींची ओळख होऊन पन्हाळगड ते विशाळगडाच्या ऐतिहासिक रणसंग्रामाची पार्श्वभूमी इतिहास अभ्यासक श्री. श्रीदत्त राऊत कथन करतील. मोहीम कार्यवाहक श्री. संदीप पाटील आणि मोहीम प्रमुख श्री.अतुल कुबल दुसर्या दिवशी सुरु होणार्या ट्रेकची माहिती आणि सूचना देतील.
शनिवार दि. 8 जुलै 2017 सकाळी 8.30 वाजता पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नरवीर शिवा काशिद आणि गडावरील नरवीर बाजीप्रभु यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेची सुरुवात होईल. आपल्या मोहिमेचे मार्गक्रमण त्याच मार्गावरून होईल, ज्या मार्गाने शिवाजी महाराज निसटले. शिवशौर्य ट्रेकर्ससोबत नरवीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभु यांची पिढी मोहिमेत दरवर्षीप्रमाणे यंदाही सहभागी होणार आहेत.
सायंकाळी 5 वा. आपण खोतवाडी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर विश्रांती.
तसेच श्रीदत्त राऊत यांच्याशी पावनखिंडीच्या इतिहासावर मुक्त चर्चा.
रविवार दि. 9 जुलै 2017 सकाळी 7.00 वाजता पुढील मुक्काम मालाईवाडा गावाच्या दिशेने ट्रेकला सुरुवात. संध्याकाळी 5.00 वा. मालाईवाडा येथे पोहोचल्यावर विश्रांती.
सोमवार दि. 10 जुलै 2017 सकाळी 7.00 वाजता पावनखिंडिकडे प्रस्थान. रणक्षेत्रावर हौतात्म्य पत्करलेल्या बाजी आणि त्यांच्या शुर बांदलवीरांना श्रद्धांजली अर्पण करून विशाळगडाकडे प्रस्थान. संध्याकाळी विशाळगडावर मोहिमेची सांगता.
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums