'मी कमी बोलतो अन् जास्त काम करतो', अडखळलेल्या भाषणावर बोलले पार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:51 PM2019-03-20T18:51:34+5:302019-03-20T18:52:50+5:30
पहिल भाषण होतं, एक दोन चुका झाल्या. याचा अर्थ असा नव्हे की त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवं.
मुंबई - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी 17 मार्चला पार्थ पवार यांच्या प्रचारसभेचा नारळ फोडण्यात आला. मात्र, आपल्या प्रचाराच्या सभेवेळी भाषण करताना पार्थ पवार चांगलेच अडखळल्याचे दिसून आले. त्यावरुन त्यांच्यावर मोठी टीकाही झाली. मात्र, याबाबत स्पष्टीकरण देताना, 'मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो' असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.
पहिल भाषण होतं, एक दोन चुका झाल्या. याचा अर्थ असा नव्हे की त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवं. मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो. आता नाही, पण मी नंतर मी कुठले मुद्दे घेऊन मतदारांपुढे जाणार याबाबतही पार्थ यांनी भाष्य केले. एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर पत्रकारांनी पार्थ यांना भाषणाबद्दल विचारणा केली होती. त्यावर, अशी भूमिका पार्थ यांनी मांडली.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. त्यावेळी पहिल्यांदाच पार्थ पवारांनी जाहीर सभेत राजकीय भाषण केलं. मात्र, पहिल्यांदा भाषण करताना पार्थ पवार काहीसे भांबावल्यासारखे दिसले.
अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ पवार बरेच गोंधळलेले दिसले. अनेकवेळा ते गडबडलेही. त्यानंतर, सोशल मीडियावर पार्थ यांच्या भाषणाची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. तर, अनेकांनी लोकसभा उमेदवार असलेल्या पार्थ यांच्या भाषणावरुन त्यांना लक्ष्य केलं.
कागदावर लिहून आणलेले भाषण पार्थ पवार यांनी वाचून दाखविले मात्र भाषणात अनेकवेळा ते गोंधळून गेले त्याची चर्चा सोशल मिडीयात होऊ लागली. पार्थ पवार यांनी भाषणाची सुरुवात करतानाच माझं हे पहिलं भाषण आहे, काही चूकभूल झाली तर माफ करा, अशी आर्जवही केली. या मेळाव्यातील अडखळलेल्या भाषणात पार्थ म्हणाले, राजकारणात जरी नवीन असलो तरी तुम्ही विश्वास दाखवा तो मी सार्थ करुन दाखवेन. तसेच या मतदार संघाला बारामती व पिपंरी चिंचवडसारखे विकसित करेन, असेही पार्थ यांनी म्हटले होते.
दरम्यान, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आणि काँग्रेस युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पार्थ यांची पाठराखण केली आहे. पार्थ लंबी रेस का घोडा आहे, असे नितेश राणेंनी म्हटले होते. तर, माशाच्या पिल्ल्लाला पोहोयला शिकवायचे नसते, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले होते.