औद्योगिक दर १० टक्क्यांच्या खाली, १ ट्रिलियन डॉलर्स गुंतवणुकीचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:14 AM2018-01-07T00:14:01+5:302018-01-07T00:14:08+5:30
राज्यातील औद्योगिक विकासाचा दर १० टक्क्यांच्या खाली असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केली. एमआयडीसीद्वारे फेब्रुवारीत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ ही जागतिक गुंतवणूक परिषद मुंबईत होणार आहे. या गुंतवणुकीचा लोगो, वेबसाइट व अॅपचे अनावरण त्यांनी केले.
मुंबई : राज्यातील औद्योगिक विकासाचा दर १० टक्क्यांच्या खाली असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केली. एमआयडीसीद्वारे फेब्रुवारीत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ ही जागतिक गुंतवणूक परिषद मुंबईत होणार आहे. या गुंतवणुकीचा लोगो, वेबसाइट व अॅपचे अनावरण त्यांनी केले.
टेक्साससारख्या काही निवडक राज्यांची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन (१ हजार अब्ज) डॉलर्सच्या पुढे आहे. महाराष्टÑातही त्या श्रेणीत जाऊ शकतो. ७-८ वर्षांत हे लक्ष्य गाठण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, त्यासाठी औद्योगिक विकास दर १० टक्क्यांच्या वर असणे गरजेचे आहे. १ ट्रिलियन डॉलर्सवरील अर्थव्यवस्था असलेले महाराष्टÑ हे देशातील एकमेव राज्य ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘मेक इन इंडिया’च्या यशाचा दावा करीत मुख्यमंत्री म्हणाले की, करारानंतर उत्पादन सुरू होण्यास ५ ते ८ वर्षांचा काळ लागतो. अशा करारांचे उद्योगांत रूपांतर होण्याचा राष्टÑीय दर ३५ टक्के आहे. महाराष्टÑात २,९८४ करारांपैकी १,५८३ कंपन्यांमधून प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. त्यांची गुंतवणूक ४.९१ लाख कोटी रुपये असून, २२ लाखांचा रोजगार निर्माण झाला आहे.
राज्याने आता संरक्षण सामग्री, हवाई क्षेत्र, लॉजिस्टीक्स, ज्वेलरी, वस्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया
या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी, सिडकोचे एमडी भूषण गगराणी, सीआयआयचे नितीन
करपे, प्रादेशिक संचालक डॉ. सौगत मुखर्जी यांच्यासह विविध देशांचे वाणिज्य अधिकारी, उद्योजक व उद्योग संघटनांचे प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते.
पंतप्रधानांचा सहभाग
पहिल्यांदाच होणा-या या जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात तीन दिवस ही परिषद चालणार आहे. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) ही या परिषदेची राष्टÑीय भागीदार आहे.