शिवसेनेचा आग्रह पालघर द्या; भाजपा म्हणते, बारामती घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 07:03 AM2019-02-06T07:03:18+5:302019-02-07T16:40:58+5:30
शिवसेनेने पालघरच्या जागेचा आग्रह धरला आहे, तर भाजपाने बारामतीचा प्रस्ताव दिल्याने युतीचे घोडे अडले आहे. बारामतीमध्ये गेल्या वेळी राष्टÑवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध रासपाचे महादेव जानकर लढले आणि पराभूत झाले होते.
मुंंबई - शिवसेनेने पालघरच्या जागेचा आग्रह धरला आहे, तर भाजपाने बारामतीचा प्रस्ताव दिल्याने युतीचे घोडे अडले आहे.
बारामतीमध्ये गेल्या वेळी राष्टÑवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध रासपाचे महादेव जानकर लढले आणि पराभूत झाले होते. त्या वेळीच त्यांनी कमळ चिन्हावर लढावे, असा भाजपाचा आग्रह होता; पण तो त्यांनी मान्य केला नव्हता. या वेळी जानकर उभे राहण्याची शक्यता नाही. शिवसेनेने बारामतीची जागा लढवावी, राज्यमंत्री असलेले पुरंदरचे आ. विजय शिवतारे यांना बारामतीत उतरविले तर ते सुळे यांना जोरदार टक्कर देऊ शकतील, असे भाजपाकडून सांगितले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शिवसेना पालघरच्या जागेवर अडून बसली आहे. तेथील पोटनिवडणुकीत दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. पण काँग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र गावित यांनी त्यांचा पराभव केला. आता शिवसेनेला पालघरची जागा हवीच असून तेथे श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देण्यावर शिवसेना अडून आहे. ‘पालघर नाही, तर युती नाही’, असे शिवसेनेने बजावल्याची माहितीही सूत्रांनी दिली. शिवाय भिवंडीसाठीही शिवसेना आग्रही आहे. तेथे भाजपाचे कपिल पाटील खासदार आहेत. ती जागा सोडण्यास भाजपा तयार नाही.
२५-२३ चा फॉर्म्युला!
सूत्रांनी सांगितले की, भाजपा-सेनेची बोलणी आता अंतिम टप्प्यात आहे. भाजपाने २५ तर शिवसेनेने २३ जागा लढवाव्यात असे सूत्र मान्य होऊ शकते. भाजपाने २०१४ मध्ये २६ तर शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या.
...तर पालघर सेनेला!
पालघरच्या मुद्द्यावर युती तुटणार असे दिसले तर भाजपा ती सेनेसाठी सोडू शकते. त्यातून उद्धव ठाकरे यांनी भाजपाला झुकविले, हा संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल, असा मतप्रवाह शिवसेनेत आहे.