कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग ४ वर्षांत तयार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 06:21 AM2019-03-04T06:21:15+5:302019-03-04T06:21:25+5:30
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग चार वर्षांत पूर्ण होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग चार वर्षांत पूर्ण होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचवेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अलिबाग ते पेणदरम्यान नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात परळ टर्मिनसहून रेल्वे सेवा सुरू करतानाच उपनगरी रेल्वेमार्गावरील अनेक सुविधा आणि प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
रेल्वेमंत्र्यांकडे अनेक प्रकल्प घेऊन गेलो होतो आणि त्या सर्व प्रकल्पांना त्यांनी मंजुरी दिली. यापुढेही आचारसंहितेच्या आधी आणि निवडणुकीनंतर रेल्वेच्या महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्पाला मंजुरी घेऊ, असे सांगतानाच फडणवीस म्हणाले की, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा हा ७२६.४५ कोटी रुपयांचा प्रकल्प उल्हासनगरमार्गे जाणार असल्याने प्रवाशांना अधिक सोयीचा ठरेल. मुंबईत सुरू असलेल्या एमयूटीपी ३ आणि एमयूटीपी ३ अ प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे.
रेल्वेने आपली ४५ एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पांना दिल्याचा पुनर्विकासाला फायदा होणार आहे. येत्या सात वर्षांत धारावीचा पुनर्विकास पूर्ण होणार असून सुमारे ५० हजार कुटुंबांना घरे देण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
>मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण
संत गाडगे महाराज स्थानक ते वडाळा या दरम्यानच्या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.