केरळची पुनरावृत्ती महाराष्ट्रतही होईल, तज्ज्ञांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 08:18 AM2018-08-28T08:18:53+5:302018-08-28T08:19:14+5:30
मुंबई : २६ जुलै २00५ रोजी झालेल्या अतिवृष्टीने अवघी मुंबापुरी पाण्यात गेली होती, तर अशाच तडाखेदार पावसाने पुणे जिल्ह्यातील माळीण गाव दरडींखाली गाडले गेले होते. यंदा तर पावसाने केरळची वाताहात केली. केरळमध्ये जे घडले ते गोवा आणि महाराष्ट्रात घडू शकते. महाराष्ट्र व गोव्यासाठी ती धोक्याची घंटा असून, आताच सावध व्हायला हवे, असे सर्वच पर्यावरणतज्ज्ञांनी म्हटले आहे.
पर्यावरणाचे आपण प्रचंड नुकसान करीत आहोत. विकासाच्या नावाखाली जंगलांची कत्तलच सुरू आहे. पश्चिम घाटाचे सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रानेच केले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी आताच काळजी घ्यावी. अन्यथा धोका फारच जवळ आला आहे, याबाबत पर्यावरणतज्ज्ञांचे एकमत आहे. पश्चिम घाटासंबंधीचा अहवाल पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांनी २0११ मध्येच सादर केला. त्यावर विचार व कृती सोडाच, पण तो जाहीरही करण्यात आला नव्हता. माहितीच्या अधिकारामुळे तो उघड झाला. त्यातही या राज्यांना इशारा देण्यात आलेला आहे. केरळमध्ये दरवर्षीच जोरदार पाऊस होतो. यंदा पावसाने असा फटका दिला की राज्यच कोलमडले. तुलनेत महाराष्ट्र व गोव्यामध्ये कमी पाऊ स पडतो. अर्थात, गाफील राहून चालणार नाही. आपण निसर्गाचे चक्रच बिघडवून टाकले आहे. त्यामुळे पावसाचा फटका कधीही बसेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
धरणेच निर्माण करतील पूरपरिस्थिती
राज्यात तब्बल ३,२00 धरणे आहेत. पिण्याचे पाणी व शेतीसाठी आपणास ही धरणे म्हणजे वरदान वाटत असली, तरी प्रचंड पावसाच्या तडाख्यात ती कधी अडचणीत आणतील, हे सांगणे अवघड आहे. पावसामुळे पाणी वाढल्यास ते धरणांमधून सोडावे लागेल. पुणे, कोकण, कोल्हापूर, नांदेड व मराठवाड्याच्या अनेक भागांत प्रचंड पूर येतील आणि केरळपेक्षा अधिक वित्तहानी आणि मनुष्यहानी होईल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी व्यक्त केली आहे.