युतीत जागेसोबत उमेदवारांचीही देवाण-घेवाण, शिवसेना-भाजपाची अशीही तडजोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 05:35 PM2019-03-26T17:35:37+5:302019-03-26T17:38:17+5:30
कोणत्याही प्रकारे शिवसेना-भाजपा युती निवडणुकीत धोका पत्करण्यासाठी तयार नाही त्यामुळे सध्या दोन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारांची देवाण-घेवाण करत असल्याची चर्चा सुरु आहे.
मुंबई - शिवसेना-भाजपा युती लोकसभा निवडणुकीत विजयी प्राप्त करण्यासाठी सरसावली असून कोणत्याही प्रकारे शिवसेना-भाजपा युती निवडणुकीत धोका पत्करण्यासाठी तयार नाही त्यामुळे सध्या दोन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारांची देवाण-घेवाण करत असल्याची चर्चा सुरु आहे. मंगळवारी पालघर येथील भाजपाचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचं शिवबंधन हातात घालून शिवसेनेत प्रवेश केला. पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याठिकाणी शिवसेनेकडून दावेदार असणारे श्रीनिवास वनगा यांनी विधानसभेला आमदारकी देण्याचं आश्वासन शिवसेनेकडून देण्यात आले आहे. इतकचं नाही तर रविवारी भाजपाच्या कोट्यातून महामंडळावर अध्यक्ष झालेले नरेंद्र पाटील यांचा कोल्हापूरच्या सभेत जाहीर व्यासपीठावर शिवसेनेत घेऊन त्यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात मागील वेळी शिवसेनेने ही जागा आरपीआय आठवले गटाला सोडण्यात आली होती. रामदास आठवले यांनी साताऱ्यातून निवडणूक लढवली होती तर पालघर लोकसभा मतदारसंघासाठी दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांनी लोकसभेची पोटनिवडणूक लढवली होती. त्यामुळे पालघरसाठी श्रीवनगा यांच्या नावाचा विचार केला जाईल असं सांगण्यात येत होते. मात्र श्रीनिवास यांनी आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची नसल्याची इच्छा व्यक्त केली मात्र श्रीनिवासला विधानसभेत आमदारकी देऊ असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना दिला.
युतीच्या जागावाटपावरुन शिवसेना-भाजपा अनेक बैठका झाल्या. जागावाटपासोबत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच तिकीट देण्यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भर दिला. त्यामुळे युती करताना ज्याठिकाणी भाजपाकडे सक्षम उमेदवार नाही अशा ठिकाणी शिवसेनेचा ताकदवान नेत्याला भाजपाकडून उमेदवारी द्यावी आणि शिवसेनेकडे उमेदवार नसल्यास भाजपाच्या उमेदवाराला शिवसेनेत प्रवेश करवून धनुष्यबाण चिन्हावर त्यांना उमेदवारी द्यावी असं ठरल्याचं चित्र सध्या दिसतंय. नांदेडमधील लोहा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. चिखलीकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती जाहीर झाल्यापासून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या हातात हात घेऊन प्रचाराला उतरले आहेत. साडेचार वर्ष शिवसेना-भाजपा पक्ष राज्यात सत्तेत एकत्र होता तरीही अनेकदा शिवसेनेकडून भाजपाला टीकेचं लक्ष्य करण्यात येत होतं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांचे वाभाडे काढले होते. मात्र निवडणुकीच्या काही महिनाभर आधी आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने युती केली त्यामुळे या युतीवर विरोधकांनी तोंडसुख घेतले.