'काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, पक्ष सक्षम करण्याची नेत्यांची भूमिका नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 02:34 PM2019-04-01T14:34:22+5:302019-04-01T14:42:14+5:30
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आपले मौन सोडलं आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे.
मुंबई - डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आपले मौन सोडलं आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे जे वास्तव आहे ते पक्षश्रेष्ठींकडे मांडलं आहे. कार्यकर्ते काँगेसवर नाराज आहे. पक्षनेतृत्वाने ही स्थिती जाणून घ्यायला हवी. लोकसभेपेक्षा विधानसभेत महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडतील असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत विखे पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. मी भाजपात जाणार आहे ही चर्चा आमच्याच पक्षांतील काही नेत्यांनी सुरु केली आहे. विधिमंडळ काँग्रेस नेता म्हणून मी काम करतो तेव्हा वाटतं पक्षनेतृत्वाने आपल्या मागे ठाम उभं राहायला हवं अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही.संयुक्त पत्रकार परिषद झाली ती अचानक घेण्यात आली. आमचे काही कार्यक्रम नियोजित असतात. त्यामुळे नाराज वैगेरे काही नाही. पक्षाने जी जबाबदारी दिलीय ती पार पडेन मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळतेय हे चित्र आहे अशी खंत विखे पाटील यांनी बोलून दाखवली.
राष्ट्रवादीशी आघाडी करण्यावर नाराजी
आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही अशा भूमिकेत वावरणार असाल तर पक्षातील कार्यकर्ते सक्षम होणार नाही. आघाडी करायची की नाही हे पक्षनेतृत्वाने ठरवायचं असतं. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षासाठी काम करतायेत असं वाटत नाही. नेत्यांकडून पक्षाला भक्कम करण्याची भूमिका दिसत नाही. काँग्रेसने कार्यशैलीत सुधारणा केली नाही तर लोकसभेपेक्षा विधानसभेत अधिक फटका बसू शकतो असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
तसेच राज्यातील नेते कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करु शकले नाहीत. नेतृत्व करण्याची क्षमता ज्यांच्यात नव्हती त्यांना नेतृत्व दिलं तर पक्ष उभा कसा राहणार? काँग्रेस पक्षाचा इतका दारुण पराभव महाराष्ट्रात कधीच झाला नाही. ज्या सुधारणा करणं गरजेचे आहे त्या केल्या गेल्या नाही असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेता केला.
तसेच दिलीप गांधी यांच्या भेटीबाबत विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दिलीप गांधी यांच्याशी जुना स्नेह आहे. राजकीयदृष्या भेटायचं असतं तर लपून भेटलो असतो. दोघांचे संबंध स्नेहपूर्ण आहे. गांधी यांच्या मुलाने उभं राहावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. व्यक्तिगत संबंधातून आम्ही नेहमीच भेटतो. त्यातून राजकीय अर्थ काढला पाहिजे असं नसतं.
शरद पवारांनी अहमदनगरच्या उमेदवाराच्या डोक्यात हवा गेली आहे अशी टीका सुजय विखेंवर केली होती या प्रश्नावरही विखे पाटील यांनी भाष्य करत सुजय हा पवारांच्या नातवासारखा आहे. काँग्रेस पक्षाशी उमेदवारी सुजय मागत होता. शरद पवारांनी अशी वक्तव्य टाळावी. विखे कुटुंबाबाबत जो विद्वेक आहे त्यातून शरद पवार असं वक्तव्य करतात असं त्यांनी सांगितले
काँग्रेस कार्यकर्ते करणार भाजपाचा प्रचार
दरम्यान भाजपासोबत जाण्याची अहमदनगरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. विखे पाटील कुटुंबाबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात प्रेम आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर राहिली नाही. कार्यकर्त्यांनीच डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून कारवाई झाली तरी चालेल अशी मानसिकता कार्यकर्त्यांची आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहत नाही अशी नाराजी त्यांच्यात आहेत असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.