ईशान्येच्या जागेवरुन सोमय्यांना विरोध कायम, प्रवीण छेडा यांच्या मातोश्रीवारीने सस्पेन्स वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 04:41 PM2019-03-27T16:41:10+5:302019-03-27T16:42:30+5:30
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छुकांचे मातोश्रीवर लॉबिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
मुंबई - शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन उद्धव ठाकरेंवर टीका करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत भाजपाने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. किरीट सोमय्या यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतल्यामुळे युतीत अजूनही या जागेचा तिढा सुटला नाही. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छुकांचे मातोश्रीवर लॉबिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
निवडणुकीच्या आधी शिवसेना-भाजपाचा युती जाहीर झाली त्यानंतर अनेक ठिकाणी या दोन्ही पक्षांनी एकमेकांशी जुळवून घेतल्याची उदाहरणे आहेत. मात्र ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना तिकीट देण्यास शिवसेनेकडून विरोध होतोय. या जागेसाठी भाजपाने दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी द्यावी अशी अन्यथा किरीट सोमय्या यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. भाजपातून या मतदारसंघासाठी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक, पराग शाह, मंत्री प्रकाश मेहता आणि नुकताच भाजपात प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपा कोणाला उमेदवारी देणार हे आगामी काळात ठरेल.
ईशान्य मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने माजी खासदार संजय दीना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील यांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे मात्र युतीकडून अद्यापही या जागेबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. राज्यभरात युतीचा प्रचारही जोमाने सुरु झाला आहे. मुंबईतील युतीचे ईशान्य मुंबई वगळता सर्वच उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.
का होतोय किरीट सोमय्यांना विरोध ?
२०१७ मधील मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आणि याआधीही अनेकदा किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत होती. मुंबई महापालिकेत टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतेही काम दिले जात आहे. वांद्र्यांच्या साहेबांना टक्केवारी जाते असा थेट आरोप मातोश्रीवर केल्याने किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांची नाराजी आहे.