Maharashtra Election 2019 : ब्लू प्रिंटऐवजी फिल्म काढली असती लोकांनी पाहिली असती- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 08:53 PM2019-10-10T20:53:52+5:302019-10-10T20:54:27+5:30
2014च्या निवडणुकीला मनसेनं संपूर्ण राज्याचा विकास आराखडा जनतेसमोर ठेवला होता.
मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गोरेगावमध्ये प्रचारसभा घेतली आहे. यावेळी त्यांनी ब्लू प्रिंटचाही आवर्जून उल्लेख केलेला आहे. 2014च्या निवडणुकीला मनसेनं संपूर्ण राज्याचा विकास आराखडा जनतेसमोर ठेवला होता. हे करणारा देशातील एकमेव पक्ष आहे. हा विकास आराखडा आणणार हे मी पक्ष स्थापनेच्या वेळेस मी बोललो होतो आणि तो आणला.
ब्लू प्रिंट महाराष्ट्रासमोर सादर करेन, असं सांगितलं होतं. ब्लू प्रिंट जाहीर केली तेव्हा कोणीही पाहिली नाही. ब्लू प्रिंटऐवजी फिल्म काढली असती लोकांनी पाहिली तरी असती, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. ईडी चौकशीनंतरही माझं तोंड बंद करणार नाही. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंबंधी देशात मी सोनिया गांधींपासून ते ममता बॅनर्जी ते शरद पवारांना देखील भेटलो. मी सुचवलं होतं की ह्या मुद्द्यावर आपण निवडणुकांवर बहिष्कार घालावा, हा मुद्दा मी राज्यातील नेत्यांना पण सांगितला, त्यासाठी पत्रकार परिषद घेतली. सरकारच्या थापा आपण ऐकत आलो आहोत.
आरेत 2700 झाडं कापली आणि न्यायालयंदेखील सरकारला साजेसं निर्णय देतेय, बरं सरकारचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे होते, तेही कत्तल थांबवू शकले नाहीत आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात की आम्हाला सत्ता द्या आम्ही आरेला जंगल घोषित करू. शिवसेनेचा पर्यावरण मंत्री असतानाही आरेतल्या झाडांची कत्तल रोखू शकला नाहीत, आम्हाला मूर्ख समजता का?, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. देशातल्या बँका डुबत आहेत. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे, वर्षानुवर्षे देशाचे पंतप्रधान भाषण करतात तो किल्लाच भाड्यानं दिला तरी लोक थंड आहेत, विरोधी पक्षनेताच भाजपात गेला, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भाजपामधून निवडणूक लढवत आहेत, राजकारणाची थट्टा सुरू झाली आहे, अशी टीकाही राज ठाकरेंनी युतीवर केली आहे.