महाराष्ट्र निवडणूक २०१९ :...तर शिवसेनेला पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 04:43 PM2019-10-24T16:43:07+5:302019-10-24T16:43:37+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. दरम्यान, कलांमध्ये भाजपाची पिछेहाट झाल्याने आता भाजपाला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीवर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू असल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाची पिछेहाट झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये भाजपाला १०० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिवसेना ५७ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सूक असलेल्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचे सुतोवाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत.