Maharashtra Election 2019: मतमोजणीसाठी २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:16 AM2019-10-24T01:16:29+5:302019-10-24T06:07:32+5:30
Maharashtra Election 2019: अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती; राज्यभरातील २६९ ठिकाणी होणार मोजणी
मुंबई : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसह सातारा लोकसभेच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यासाठी राज्यभरात २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी दिली.
राज्यभरात २६९ ठिकाणी २८८ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एका मतदारसंघातील पाच बुथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठी टाकून या पाच बूथची निवड केली जाईल. त्यानंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे. स्ट्राँगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच अॅपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिडीओ चित्रीकरण
प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. स्ट्रॉंगरूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. स्ट्रॉंगरूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे आदींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.