गुणपत्रिका तयार, पण सहीच मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 06:03 AM2017-08-19T06:03:36+5:302017-08-19T06:03:38+5:30
मुंबई विद्यापीठातील निकालाच्या गोंधळात रोज भर पाडणा-या नवीन गोष्टींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.
पूजा दामले ।
मुंबई : मुंबई विद्यापीठातील निकालाच्या गोंधळात रोज भर पाडणा-या नवीन गोष्टींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. आता परदेशात अथवा दुसºया राज्यात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी जाणाºया विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रिका छापून तयार आहेत, पण गुणपत्रिकांवर स्वाक्षरी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कलिना कॅम्पसमधील महात्मा फुले भवनाच्या पायºया झिजवाव्या लागत आहेत. प्रभारी खांद्यावर विद्यापीठाच्या कारभाराची धुरा असल्यामुळे प्रक्रिया रखडत असल्याची नाराजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
आॅगस्ट महिना उजाडूनही अद्याप विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच विद्यापीठ रोज नवनवीन कारणे देऊन विद्यार्थ्यांना गुणपत्रिका अथवा निकाल देत नसल्याने विद्यार्थी आणि पालकही त्रस्त झाले आहेत. हेल्प डेस्ककडून मदत घेऊन गुणपत्रिका विद्यार्थ्यांना थेट मिळत होत्या. पण महाविद्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणा तरच निकाल मिळेल, असा नवीन नियम विद्यापीठाने काढला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चांगलीच धावपळ होते. स्वाक्षरीअभावी निकाल समोर असूनही मिळत नाही. त्यातच शुक्रवारी दुपारी परीक्षा भवनाचे इंटरनेट डाऊन झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तेथे निकाल लागला आहे, अथवा अन्य माहितीदेखील तपासायला मिळत नव्हती. उत्तरपत्रिका तपासणी आॅनलाइन केली. मग आता निकालही आॅनलाइन का देत नाहीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
>आज सहा निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाने शुक्रवारी एकूण सहा निकाल जाहीर केले आहेत. आत्तापर्यंत विद्यापीठाने ३६० निकाल जाहीर केले असून अद्याप ११७ निकाल जाहीर करणे बाकी आहे. मुंबई विद्यापीठाला अजूनही १ लाख ४७ हजार ७६ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. तर, ४६ हजार ४७६ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन बाकी आहे. शुक्रवारी विद्यापीठात ५७५ प्राध्यापकांनी मिळून एकूण १० हजार ५ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली. कला शाखेचे १४१, वाणिज्यचे १९, विज्ञानाचे २८, मॅनेजमेंटचे २७, टेक्नॉलॉजीचे १४० तर विधीचे फक्त ५ निकाल जाहीर झाले आहेत.
>शेवटच्या क्षणी निकालांसाठी नवीन टीम
विद्यापीठाचा कारभार प्रभारी खांद्यावर असताना, निकालाच्या शेवटच्या क्षणी आता नवीन टीम तयार करण्यात येणार आहे. नागपूर विद्यापीठातून तज्ज्ञांची टीम येणार आहे, तर यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचीही निकालासाठी मदत घेतली जाणार आहे. अपूर्ण राहिलेल्या निकालांची मोजदाद ठेवण्यासाठी वेगळी टीम तयार करण्यात आली आहे. सोबतच हेल्पडेस्कवर विद्यार्थी कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. मृदुल निळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
>माझा निकाल तयार आहे, पण सही झाली नाही, म्हणून देणार नाही, असे मला सांगण्यात आले. माझा परदेशात प्रवेश निश्चित झाला आहे. १ सप्टेंबरला मला जायचे आहे, पण गेल्या १५ दिवसांपासून मी खेपा मारत आहे. - विद्यार्थिनी
>मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. एमएससाठी माझा प्रवेश निश्चित झाला आहे, पण अजूनही निकाल जाहीर झालेला नाही. रोज नवीन उत्तरे मिळतात. आज मला ना हरकत प्रमाणपत्र आणायला सांगितले. माझा निकाल मिळत नसल्याने, मी आतापर्यंत दोनदा व्हिसाची अपॉइंटमेंट रद्द केली आहे. - विद्यार्थी