मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 05:04 PM2019-04-07T17:04:02+5:302019-04-07T17:16:16+5:30
मराठा क्रांती मोर्चा, महामुंबईने मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मुख्य मागण्यांसाठी रविवारी राजर्षी शाहू महाराज सभागृह, दादर येथे आढावा बैठक घेतली.
मुंबई - मराठा क्रांती मोर्चा, महामुंबईने मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मुख्य मागण्यांसाठी रविवारी (7 एप्रिल) राजर्षी शाहू महाराज सभागृह, दादर येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई व पालघर जिल्ह्यातील मराठा बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मराठा आरक्षणाच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या मराठा वकील बांधवांतर्फे सर्व न्यायालयीन गोष्टी मराठा समाज बांधवांना बैठकीत व्यवस्थित समजावून सांगण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षण संदर्भात सरकारने कशा प्रकारे दिरंगाई केली आणि कोर्टाने काही मागणी न करता ही सरकारने अनाहूतपणे भरती प्रक्रियेत मराठा युवकांना नियुक्तीपत्र दिले जाणार नसल्याचे शपथपत्र सादर केल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षण संदर्भात पुकारलेल्या बंद दरम्यान ज्या निरपराध मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांना सराईत गुन्हेगारांच्या पंक्तीत बसवले गेले आहे. तसेच आजही नोटीस पाठवून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. मराठा क्रांती मोर्चा, महामुंबई यांनी खंबीर भूमिका घेत कोर्टाच्या प्रक्रियेत आपल्या इतर मराठा बांधवांसह पुरावे सादर करीत मराठा आरक्षणाची बाजू सबळपणे मांडली आहे. मराठा आरक्षणाची न्यायालायीन लढाई येथून पुढेही मराठा समाज पूर्ण ताकदीने लढेल असा निर्धार यावेळी व्यक्त केला गेला. मुंबईस्थित शिवस्मारक, आर्थिक महामंडळ, मराठा विद्यार्थ्यांकरिताचे हॉस्टेल, सारथी सारख्या योजना यातही अक्षम्य दिरंगाई केली गेली आहे असे निदर्शनास आले आहे.
सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केल्याचा बैठकीचा सूर निघाला आहे. सरकारच्या धोरणाविषयी जमलेल्या मराठा बांधवांनी असंतोष व्यक्त करीत निवडणुकीत सरकार विरोधी सूर निघाला. लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चा, महामुंबई तर्फे पाचही जिल्ह्यातून कोणीही उमेदवार म्हणून पुरस्कृत केला नसल्याचे जाहीर करण्यात आले. महामुंबई समन्वयकांनी समाजाचा कोणताही निर्णय वा धोरण राज्यस्तरीय बैठकीमध्ये घेण्यात येईल व महामुंबईकर मराठा बांधवांच्या भावना सदर राज्यस्तरीय बैठकीमध्ये मांडण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.