Maratha Reservation: सकल मराठा समाज राजकारणाच्या आखाड्यात उतरणार; दिवाळीत पक्ष स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:15 PM2018-09-12T14:15:31+5:302018-09-12T14:33:04+5:30
Maratha Reservation: सकल मराठा समाजाकडून रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना केली जाणार
कोल्हापूर: सकल मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर समाजबांधवांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न समाजाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी आजपासून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमधून या दौऱ्याची सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत. मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सध्या सरकारकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेचला आहे.
सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. प्रत्येक पक्ष हा समाजाचा वापर करत आला आहे. यामुळे न्याय्य हक्कासाठी सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन केला जावा, अशी समाजाची भावना आहे. याबद्दलची घोषणा ऑक्टोबर अखेर केली जाईल. तत्पूर्वी समाजबांधवांची मते आजमावण्यासाठी आजपासून कोल्हापुरातून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, याकरिता गेले २५ वर्षे विविध मार्गांनी शासनाशी संघर्ष सुरू आहे; परंतु कोणत्याही सरकारने मराठा समाजाची दखल घेतलेली नाही, असं मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
५८ मूक मोर्चे काढूनही समाजाच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्यभर दौरा करून मराठा समाजबांधव व संघटनांशी चर्चा केली जाणार आहे. याची सुरुवात कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यातून झाली आहे. मराठा मोर्चाच्या माध्यमातून समाज एकत्र आला. समाजातील ही एकी टिकवून ठेवून स्वत:चं स्वतंत्र टिकवण्याच्या उद्देशातून मराठा समाजाकडून पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.