म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी, मुंबईत घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 04:30 PM2018-10-11T16:30:09+5:302018-10-11T16:30:24+5:30
म्हाडाच्या घरांच्या किमती लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळेच दिवाळीपूर्वीच म्हाडा घर खरेदी करणा-या सामान्य माणसांना मोठी गूड न्यूज देणार आहे.
मुंबईः म्हाडाच्या घरांच्या किमती लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळेच दिवाळीपूर्वीच म्हाडा घर खरेदी करणा-या सामान्य माणसांना मोठी गूड न्यूज देणार आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना म्हाडा मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार असल्याची माहिती दिली आहे.
म्हाडाच्या घराच्या किमती कमी करण्याचा आमचा प्रस्ताव होता. म्हाडाच्या घर विक्रीसाठी तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत. जी घरं पडून आहेत. त्यांची किंमत कमी करून ती पुन्हा विक्रीला काढण्यात येणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही मुंबईकरांना दिवाळीची भेट देऊ, असंही उदय सामंत म्हणाले आहेत. बिल्डरकडून आलेल्या किमती कमी करून आम्ही सामान्यांना घरं उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर ती घरं नागरिकांसाठी खुली करण्यात येतील, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
म्हाडाकडून लवकरच 1 हजार 194 घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची घोषणाही उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनीदेखील यापूर्वीच म्हाडाची लॉटरी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये काढली जाईल, असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. वडाळ्यातील अॅन्टॉप हिल येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 278 घरे असतील, घराची किंमत पावणे एकतीस लाखांच्या आसपास असेल. सायन प्रतीक्षानगर येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 83 घरे असतील, घराची किंमत पावणे एकोणतीस लाखांच्या आसपास असेल. सायन प्रतीक्षानगर येथे अत्यल्प गटासाठी 5 घरे असतील, घराची किंमत साडेसोळा लाख असेल. मानखुर्द येथे अत्यल्प गटासाठी 114 घरे असतील, घराची किंमत सव्वा सत्तावीस लाख असेल. मुलुंड येथे अल्प उत्पन्न गटासाठी घरे असतील, घराची किंमत तीस लाख असेल. गोरेगाव येथे अल्प उत्पन्न गटासाठी 24 घरे असतील, घराची किंमत पावणे बत्तीस लाख असेल.