युवा वर्गावर ‘मोदी-राज’चीच भुरळ! अर्जित, विराटचे अधिराज्य कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 06:12 AM2018-01-12T06:12:48+5:302018-01-12T06:13:15+5:30
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशात ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ साली ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्षा’ची घोषणा केली. त्याच वर्षी भारत सरकारनेही १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे निमित्त साधत राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
‘राष्ट्रीय युवा दिन’ विशेष
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशात ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ साली ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्षा’ची घोषणा केली. त्याच वर्षी भारत सरकारनेही १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे निमित्त साधत राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंद यांचे जीवन युवकांसाठी मोठे प्रेरणास्रोत आहे. याचाच आधार घेत आजची तरुण पिढी विविध क्षेत्रांत त्यांचा आदर्श नेमका कुणाला मानते याचा शोध घेण्याचा ‘लोकमत’ने केलेला हा प्रयत्न...
मुंबई : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘लोकमत’ने मुंबईतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे आयकॉन कोण, हे जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले. यामध्ये काही धक्कादायक उत्तरेही मिळाली. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या-कोणत्या क्षेत्रात त्यांचा आयकॉन ठरवल्याचे कळले. यानुसार राजकारणात नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे युवकांमध्ये फेव्हरेट असल्याचे दिसून आले, तर विराट कोहली, अर्जित सिंग, नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे युवांवर अधिराज्य कायम असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
तरुणाईच्या मनातील आयकॉन हेरण्यासाठी ‘लोकमत’ने सर्वेक्षणात १२ क्षेत्रांचा समावेश केला होता. त्यात कला, क्रीडा, साहित्य, राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकारण अशा विविध क्षेत्रांचा समावेश होता. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी या सर्वेक्षणासाठी मुंबई शहरासह उपगनरातील विविध महाविद्यालयांत जाऊन प्रश्नावली भरून घेतल्या. या वेळी तरुणाईने दिलेल्या पर्यायाव्यतिरिक्त पर्यायही स्वीकारले. सर्वेक्षण केलेल्या महाविद्यलयांत ठाकूर महाविद्यालय, ओरिएन्टल स्कूल आॅफ बिझनेस, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय, महर्षी दयानंद महाविद्यालय, विल्सन महाविद्यालय, कीर्ती महाविद्यालय, कलानिकेतन, रचना कला महाविद्याल, एच. आर. महाविद्यालय, विकास महाविद्यालय, एसएनडीटी, स्वामी विवेकानंद, व्हीजेटीआय, सिडनहॅम महाविद्यालय, रुईया, सोमय्या, शासकीय विधि महाविद्यालय, साठ्ये महाविद्यालय अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच सर्वेक्षणात मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही सामील करून घेण्यात आले होते.
सर्वेक्षणावर दृष्टिक्षेप
राजकीय (राष्ट्रीय)
राष्ट्रीय राजकारणात भारताचे १६वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युवकांनी त्यांच्या पहिल्या पसंतीचे स्थान दिले आहे. मे २०१४ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून खासदार म्हणून विजयी झालेल्या मोदी यांनी गेल्या तीन वर्षांत धडाडीचे निर्णय घेतले आहेत. मोदी यांनी स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा विविध माध्यमांतून तरुणांना भुरळ घातली आहे.
नरेंद्र मोदी 78.37%
राहूल गांधी : 7.20
जिग्नेश मेवानी : 5.40
हार्दिक पटेल : 2.70
अन्य : 6.30
राजकीय (राज्य)
तरुणांचा नेता अशी ओळख असलेल्या राज ठाकरे यांना युवा वर्गाने राज्यातील राजकारणात पहिल्या क्रमांकाचे स्थान दिले आहे. परखड व्यक्तिमत्त्व आणि तरुण तडफदार नेता म्हणून राज तरुणाईला कायमच जवळचे वाटतात. विशेषत: त्यांचा आक्रमकपणा तरुणाईला भावतो यावर या सर्वेक्षणातून शिक्कामोर्तब होते.
राज ठाकरे 53.15%
देवेंद्र फडणवीस - 27.02
उद्धव ठाकरे- 14.41
अजित पवार - 2.70
अन्य - 2.70
सामाजिक
सामाजिक क्षेत्रात प्रकाश आमटे यांचे नाव कायमच आदराने घेतले जाते. बाबा आमटे यांच्यानंतर त्यांचा वसा कायम ठेवत आपले स्थान निर्माण करत प्रकाश आमटे यांनी तरुणाईसमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेषत: दुर्गम भागात कार्यरत राहत त्यांनी युवा पिढीला घालून दिलेला आदर्श हा तरुणाईसाठी कायमच दिशादर्शक आहे.
प्रकाश आमटे 48.18%
अण्णा हजारे - 12.72
नाना पाटेकर - 34.54
कन्हैया कुमार - 3.63
अन्य - 0.90
गायक/हिंदी
२००५ सालापासून पार्श्वगायन करणारा अरिजीत सध्या बॉलीवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. २०१३ सालच्या ‘आशिकी २’ चित्रपटामधील ‘तुम ही हो’ या गाण्यासाठी अरिजीत प्रसिद्धीझोतात आला. या गाण्यासाठी त्याला सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले. ‘आशिकी २’नंतर अरिजीत तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. एवढेच नाही तर त्यानंतर ‘चन्ना मेरेया’, ‘कबिरा’, ‘मस्तमगन’, ‘मै रंग शरबतो का’, ‘फिर ले आया’, ‘हमारी अधुरी कहानी’, ‘मै फिर भी तुमको
चाहूँगा’ अशा त्याच्या सर्वच गाण्यांनी प्रत्येकाच्याच प्लेलिस्टमध्ये सहजच
जागा मिळविली.
अर्जित सिंग 67.27%
यो यो हनीसिंग - 6.36
बादशाह - 13.63
शाल्मली खोलगडे - 10.90
५) अन्य - 1.81
मनोरंजन/बॉलीवूड
किरकोळ शरीरयष्टी मात्र तितकाज दमदार अभिनय म्हणून परिचित असलेला नवाजुद्दिन काही वर्षांपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीला माहीतही नव्हता. छोट्या-छोट्या भूमिकांमधून चित्रपटसृष्टीत टिकलेल्या नवाजुद्दिनने आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यावर बडे चित्रपट मिळवले. काहीच दिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारण्याचा मान त्याला मिळाला. त्यामुळे युवा वर्गात सध्या त्याची प्रचंड क्रेज दिसत आहे.
नवाजुद्दिन सिद्दिकी 39.09%
आलिया भट - 17.27
वरुण धवन -15.45
रणवीर सिंग - 24.54
अन्य - 3.63
मनोरंजन/मराठी
मराठी चित्रपटसृष्टीवर गेल्या कैक वर्षांपासून आपली भुरळ घातलेला अंकुश चौधरी आजही युवा वर्गात लोकप्रिय आहे. विनोदी आणि गंभीर भूमिकांमधून त्याने नेहमीच आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. विशेषत: युवा वर्गाच्या प्रतिमा अभिनयातून दाखवण्याचे कसब त्याच्याकडे आहे. म्हणूनच ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात त्याला अव्वल स्थान मिळाले आहे.
अंकुश चौधरी 29.09%
सई ताम्हणकर - 23.63
प्रिया बापट - 25.45
स्वप्निल जोशी - 18.18
अन्य - 3.63
साहित्य
डझनभर मराठी चित्रपटांच्या गाण्यांपासून छोट्या पडद्यांवरील मालिकांचे शीर्षक गीत व पटकथा लिहिणारे अरविंद जगताप हे नाव नेहमीच पडद्यामागे राहिले आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी मालिकेत गंभीर पत्रे लिहिणाºया अरविंद यांनी थोरामोठांच्या मनात जागा कमावली आहे. त्यामुळे दिग्गज लेखकांच्या स्पर्धेतही त्यांचे साहित्य उठून दिसत असल्याचे या सर्वेक्षणातून दिसले.
अरविंद जगताप 36.03%
चेतन भगत - 27.92
विश्वास पाटील - 17.11
गुरु ठाकूर - 14.41
अन्य - 4.50
सोशल मीडिया
फोनकॉल्स, एसएमएसनंतर व्हॉट्सअॅप हे मेसेंजिग अॅप्लिकेशन सर्वांच्याच आयुष्याचा भाग बनले आहे. स्मार्टफोन्स इंटरनेट सेवेच्या अंतर्गत या अॅपच्या मिळणाºया सेवेने सातासमुद्रापार माणसे एका क्लिकवर जोडली. याशिवाय, या अॅपच्या माध्यमातून जुनी-नवी माणसे जोडणेही सहज झाले आहे. तसेच, स्टेटस, व्हिडीओ कॉलिंग, ग्रुप्स या फिचर्सने अक्षरश: हे अॅप सर्वांचेच ‘फेव्हरेट’ झाले आहे.
व्हॉट्सअॅप 44.54%
फेसबुक - 16.36
ट्विटर - 8.18
इन्स्टाग्राम - 30
अन्य - 0.90
गायक/मराठी
अजय-अतुल ही भारतीय संगीतातील आघाडीची संगीतकार जोडी आहे. त्यांनी भारतीय संगीतक्षेत्रात हिंदी, मराठी, तेलुगूसारख्या विविध भाषांमधील चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘विश्वविनायक’ या संगीत गीतसंग्रहाद्वारे संगीतक्षेत्रात पदार्पण केलेल्या या जोडगोळीच्या ‘सैराट’ चित्रपटातील गाण्यांची जादू अजूनही तरुणाईला भुरळ घालतेय.
अजय-अतुल 54.78%
महेश काळे - 16.52
आदर्श शिंदे - 13.04
स्वप्निल बांदोडकर - 14.78
अन्य - 0.86
उद्योग
यशाचे शिखर पादाक्रांत करूनही कायम जमिनीवर असलेल्या रतन टाटा यांना युवाने मानाचे पहिले स्थान दिले आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व अशी ख्याती असलेल्या रतन टाटा यांनी युवा पिढीसह सर्वच पिढ्यांना भुरळ घातली आहे. संयम आणि नेतृत्व या गुणांमुळे रतन टाटा कायमच यशाच्या टोकावर राहिले आहेत.
रतन टाटा 50.00%
मार्क झुकेरबर्ग - 16.66
मुकेश अंबानी - 27.19
आदित्य बिर्ला - 4.38
अन्य - 1.75
नृत्यक्षेत्र
रिअॅलिटी शोमुळे गेल्या बºयाच वर्षांपासून काही नवे चेहरे प्रकाशझोतात आले आहेत. अशाच काही चेहºयांपैकी एक म्हणजे धर्मेश येलंडे. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून धर्मेशच्या नृत्यकौशल्याची झलक अनेकांनीच पाहिली असेल. कोणत्याही मोठ्या कलाकाराचा वरदहस्त नसताना फक्त आपल्या नृत्यकौशल्याच्या बळावरच धर्मेशने हे यश संपादन केले आहे. आजही कित्येक वर्षांनंतरही धर्मेशच्या आॅडिशनचा व्हिडीओ यंगस्टर्स फेसबुकवर व युट्युबवर पाहून एन्जॉय करतात.
धर्मेश 57.02%
नकुल घाणेकर - 3.30
शक्ती - 28.09
मानसी नाईक - 11.57
अन्य -0
क्रीडा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून ओळख असलेला विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरला आहे. मैदानावरील धावांचा रतीब असेल किंवा सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मासोबत झालेला विवाह; या सर्वच गोष्टींमुळे विराट माध्यमांत आणि तरुणाईमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला. म्हणूनच तरुणाईसाठी तो आयडॉल ठरला आहे.
विराट कोहली 58.55%
पी.व्ही. सिंधू - 30.63
सुनील छेत्री - 2.70
रिशांक देवाडीगा- 7.20
अन्य - 0.90
(सहभाग - सचिन लुंगसे, मनीषा म्हात्रे, पूजा दामले, स्नेहा मोरे, चेतन ननावरे, महेश चेमटे, अक्षय चोरगे, सागर नेवरेकर, कुलदीप घायवट)