'बेस्ट' कामगारांच्या संपाला सत्ताधारी शिवसेनेचा 'नैतिक पाठिंबा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:18 AM2019-01-08T08:18:01+5:302019-01-08T08:18:37+5:30
सत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, कामगारांचा कौल संपाच्या बाजूने असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे.
मुंबई : सत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, कामगारांचा कौल संपाच्या बाजूने असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे या संपाला शिवसेना नेत्यांनी नैतिक पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या वर्षी कामगारांनी पुकारलेला संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कामगारांनी मागे घेतला होता. त्यामुळे पुन्हा संप होऊ नये, यासाठी शिवसेना नेत्यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, बेस्ट प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी जादा गाड्या सोडण्यासाठी एस.टी. महामंडळाला पत्र पाठविले असल्याचे बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, ९५ टक्के कामगार संपाच्या बाजूने असल्यामुळे बससेवेवर परिणाम होणार आहे.
या मागण्यांसाठी संप
महापालिका कर्मचाºयांप्रमाणे २०१६-२०१७, २०१७-२०१८ या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे.
एप्रिल २०१६पासून लागू होणाºया वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी.
अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती.
बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल.
कामगारांच्या निवास स्थानाचा प्रश्न सोडविणे.
बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक आणि वीजपुरवठा विभागात एकूण ४४ हजार कामगार-कर्मचारी आहेत. यापैकी ३६ हजार वाहतूक विभागात आहेत. त्यांच्या वेतनापोटी दरमहा १२० कोटी रुपयांची तजवीज बेस्ट प्रशासनाला करावी लागते.