अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनांचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:36 AM2018-04-28T01:36:56+5:302018-04-28T01:36:56+5:30
दिवाकर रावते यांचा निर्णय : प्रवाशांना मिळणार दिलासा
मुंबई : सध्या असलेल्या सुट्टीचा काळ लक्षात घेता, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचा तिकीट दर लक्षात घेत, दीडपटपेक्षा अधिक भाडे आकारणाºया खासगी वाहनांचा परवाना रद्द करण्याचे आदेश मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत.
गर्दीच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहनांकडून (बस, ट्रॅव्हल्स इत्यादी)तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली जाते. अशा खासगी वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, खासगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार, एसटी तिकीट दरांच्या तुलनेत खासगी वाहनांना जास्तीतजास्त दीडपट भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास मोटार वाहन कायदा/नियमाप्रमाणे संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्यात येईल, असे मंत्री रावते यांनी सांगितले.
पुणे येथील केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेची खासगी वाहनांचे दर ठरविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.या संस्थेने खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोईसुविधांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. या वाहनांची वर्गवारी प्रामुख्याने वातानुकूलित (एसी), अवातानुकूलित (नॉन एसी), शयनशान (स्लीपर), आसन व्यवस्थेसह असलेली शयनयान (सेमी स्लीपर) इत्यादी प्रकारात करण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार असे असतील तिकीट दर
खासगी व्होल्वो बस (अंदाजित)
मुंबई-पुणे (१६५ किमी) ६५० रुपये
मुंबई -गोवा (५७५ किमी) २२७५ रुपये
एसटी व्होल्वो (अंदाजित)
मुंबई-पुणे (१६५ किमी) ४४१ रुपये
मुंबई-गोवा (५७५ किमी) १५३५ रुपये