मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष पेटणार
By admin | Published: July 2, 2015 11:33 PM2015-07-02T23:33:46+5:302015-07-02T23:33:46+5:30
इंदापूर ते कशेडी घाटदरम्यान होणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील पोलादपूर परिसरातील प्रस्तावित जमीन अधिग्रहण बाधितांनी संघर्ष समिती स्थापन
पोलादपूर : इंदापूर ते कशेडी घाटदरम्यान होणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील पोलादपूर परिसरातील प्रस्तावित जमीन अधिग्रहण बाधितांनी संघर्ष समिती स्थापन करून विरोध केला आहे. अन्यायकारक निर्णय घेतल्यास आंदोलन करणार असल्याच्या पवित्र्यात समिती आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत कोणाचाही विरोध नाही, मात्र कोणावरही अन्याय होता कामा नये, अशी आग्रही मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. समितीने याबाबत बैठका घेऊन आपली मागणी व आंदोलनाची दिशा ठरविली असून प्रांताधिकारी सुषमा सातपुते आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना याबाबत मागणीचे निवेदन दिले आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंची जमीन समान प्रमाणात घ्या, प्रकल्पात जाणाऱ्या जमिनींना बाजारभावानुसार भरपाई द्या. नळ पाणीपुरवठा योजनेचे पुनर्व्यवस्थापन करून द्या, प्रकल्पाची सविस्तर माहिती प्रकल्पग्रस्तांना द्या, जादा जमीन संपादित करू नका, पारदर्शकप्रमाणे काम करा, प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करू नका, अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली असून याबाबतचा पत्रव्यवहार समितीने सुरू केला असून मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका समितीमधील सदस्यांनी घेतली असल्याचे राजन धुमान यांनी सांगितले आहे. इंदापूर ते कशेडी घाटदरम्यान होणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील पुढील टप्प्यातील काम सध्या वेगाने सुरू आहे. (वार्ताहर)