मुंबईला मिळणार सर्वाधिक खड्डे असलेल्या शहराचा 'मान'?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 10:25 AM2018-08-29T10:25:54+5:302018-08-29T10:28:58+5:30
खड्ड्यांमुळे मुंबईची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होण्याची शक्यता
मुंबई: मुंबईचे रस्ते आणि खड्डे हे जणू समीकरणच झालं आहे. पावसाच्या दिवसात तर मुंबईतील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. मात्र संबंधित यंत्रणांना याचं कोणतंही सोयरसुतक नाही. त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार विभागाचे सचिव नवीन लाडे यांनी मुंबईतील खड्डे मोजून शहराची नोंद गिनीज बुकसह लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नवीन लाडे आणि त्यांच्या टीमला आतापर्यंत शहरात 26 हजार 934 खड्डे आढळले आहेत. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून त्यांच्याकडून खड्ड्यांची मोजणी सुरू होती. शहरातील किमान 20 हजार खड्डे शोधण्याचा लाडे यांचा प्रयत्न होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना शहरात त्यापेक्षा जास्त खड्डे आढळून आले. यानंतर त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्याशी संपर्क साधला. सर्वाधिक खड्डे असलेलं शहर असा विक्रम मुंबईच्या नावे नोंदला जावा, यासाठी लाडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
गिनीज बुक ऑफ रेकॉड्सकडून लाडे यांना फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. लाडे यांचा प्रयत्न राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉड्सच्या प्रशासनानं म्हटलं आहे. इतर शहरांमधील खड्ड्यांची आकडेवारी नसल्यानं मुंबईला हा 'मान' कसा द्यायचा, असाही प्रश्न गिनीज बुक ऑफ रेकॉड्सकडून विचारण्यात आला आहे. तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून लाडे यांनी दिलेल्या आकडेवारीची पडताळणी केली जाणार आहे. लाडे यांनी खड्डे मोजण्यासाठी लोकांना खड्डे आणि ठिकाण पाठवण्याचं आवाहन केलं होतं. एकाच खड्ड्याची नोंद दोनदा होऊ नये, यासाठी लाडे यांच्या टीमकडून खड्ड्यांचं जिओ टॅगिंगदेखील करण्यात आलं. यासाठी 4 लाख रुपयांचा खर्च आला.