फक्त शिवाजी नाही, शिवाजी महाराज... मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 02:44 PM2018-08-08T14:44:12+5:302018-08-08T14:52:59+5:30
800 शिवसैनिकांनी गनिमिकाव्याने सहार विमानतळावर प्रवाशांची वाट रोखली
मनोहर कुंभेजकर
मुंबई - अंधेरी (पूर्व) सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात 'महाराज' हा शब्द जोडण्यासाठी शिवसेनेच्या 800 कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत बुधवारी (8 ऑगस्ट) सुमारे अडीच तास विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनानंतर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 'महाराज' हा शब्द विमानतळाच्या नावात जोडू, असे ठोस आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिल्याची माहिती आमदार व विभागप्रमुख अॅड.अनिल परब यांनी 'लोकमत'ला दिली. 1990 पासून वॉचडॉग फाऊंडेशनचे अॅड.ग्रोडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी महाराज या नावासाठी सातत्याने लढा दिला होता. तर लोकमतने तब्बल 40 वेळा हा विषय मांडला होता, असे वॉचडॉग फाऊंडेशनने अभिमानाने सांगितले.
1990 साली शिवसेना व भाजपाच्या आमदार, लोकप्रतिनिधी आम्ही सहार गावकऱ्यांनी आंदोलन केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. तर लोकमतच्या वृतांची दखल घेत अंधेरी (पूर्व) येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उचलला होता. मात्र गेली 3 वर्षे हा प्रश्न केंद्र सरकारच्या हवाई उड्डाण मंत्रालयाकडे प्रलंबित होता. गेल्या 15 दिवसांपूर्वी उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमत वृतांची दखल घेऊन लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी महाराज हा शब्द या विमानतळाच्या नावात जोडण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली होती.
'मे 2017 पासून लोकमतच्या वृत्ताचा हवाला देत केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता', अशी माहिती शेट्टी यांनी दिली. मात्र आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व आमदार अॅड.अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने गनिमीकाव्याने अभूतपूर्व अडीच तास आंदोलन केले व या आंदोलनानंतर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळाच्या नावात 'महाराज' हा शब्द जोडला जाणार आहे.