मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक लोकल लवकरच धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 07:55 AM2019-01-06T07:55:10+5:302019-01-06T07:55:47+5:30
१० जानेवारीला चाचणी : चेन्नईच्या कोच फॅक्टरीत विशेष गाडी तयार
मुंबई : मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिकला ‘लोकल’सेवेने जोडण्याचा मार्ग आता दृष्टीपथात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही चर्चा आता सत्यात उतरणार आहे. उच्च दाब शक्ती असलेली विशेष १२ डब्यांची लोकल १० जानेवारीला चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून मध्य रेल्वेच्या ताफ्यात पोहोचेल. त्यानंतर या विशेष गाडीची चाचणी होऊन ती प्रवाशांच्या सेवेस दाखल होण्याची शक्यता आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईहून लोकलने थेट नाशिक, पुणे गाठता येणार आहे.
खंडाळा आणि कसारा घाट सामान्य लोकलने पार करणे अवघड आहे. एक्सप्रेससाठीही बँकर इंजिनाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे लोकलच्या इंजिनात बदल करून त्या चालविणे शक्य आहे, अशा सूचना रिसर्च डिझाईन अॅन्ड स्टॅन्डर्स आॅरगनाझेशन (आरडीएसओ) यांनी केल्या होत्या. त्यानुसार ही नवी गाडी तयार करण्यात आली आहे. या गाडीची चाचणी यशस्वी ठरल्यानंतरच आणखी काही गाड्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत, मुंबईहून नाशिक आणि पुण्यासाठी अनेक एक्सप्रेस गाड्या आहेत. त्यात डेक्कन क्वीन, पंचवटी, प्रगती, राज्यराणी, सिंहगड या आहेत. यामध्ये गर्दीचे प्रमाण अधिक आहे. लोकल सुरू झाल्यास गर्दीची समस्या कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक लोकल सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. या लोकल सुरू करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत असून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकल सेवा सुरू करण्याआधी विविध चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यानंतरच प्रवाशांसाठी मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक लोकल सुविधा येण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.
शेतकरी, विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा
च्नाशिक येथील शेतकरी वर्गाला मुंबईसारखी बाजारपेठ खुली होईल.
च्शिक्षणाचे माहेर घर, आर्थिक राजधानी लोकलने जोडले जातील.
च्विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षणासाठी मोलाची संधी उपलब्ध होईल.
च्कमी वेळेत, कमी पैशात प्रवास शक्य
च्गर्दीचीकोंडी फोडता येऊन, प्रवाशांना सुकर प्रवास करता येईल.
अनेक वर्षापासून या लोकलबाबतची मागणी करत होतो. आता मुंबई-पुणे लोकल सेवा सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
- पंकज ओसवाल,
सामाजिक कार्यकर्ता, कर्जत
मुंबई-नाशिक लोकल सेवा सुरू होणे आवश्यक आहे. यासंदर्भात संसदेत मागणी केली आहे. या सेवेमुळे नाशिकमधील शेतकरी, तरूणवर्गाला खूप मोठा फायदा होईल.
- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक