पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 01:37 PM2024-05-16T13:37:56+5:302024-05-16T13:38:06+5:30
PM Modi Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजी पार्क येथील सभेसाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत १४ तासांसाठी बदल करण्यात आले आहेत
Mumbai traffic : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचारासाठी शुक्रवारी संयुक्त सभा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या होत्या. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची शेवटची सभा पार पडणार आहे. त्यामुळे या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
मनसेतर्फे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर नागरीक हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून येणार आहेत. त्यामुळे पश्चिम व पुर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
वाहने उभी करण्यास बंदी असलेले रस्ते -
१. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम.
२. संपुर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर
३. संपुर्ण एम. बी. राऊत मार्ग
४. पांडुरंग नाईक मार्ग
५. दादासाहेब रेगे मार्ग
६. दिलीप गुप्ते मार्ग: शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड
७. एल. जे. रोड : गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल
८. एन. सी. केळकर मार्ग: हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन
९. टी. एच. कटारीया मार्ग गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन
१०. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन
११. टिळक रोड:- कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर. ए. किडवाई रोड
१२. खान अब्दुल गफारखान रोड सी लिंक गेट ते जे. के. कपुर चौक ते बिंदु माधव ठाकरे चौक.
१३. थडानी मार्ग:- पोददार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक.
१४. डॉ. अॅनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पीटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.
वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था
१. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी: श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन ते यस बँक जंक्शन. (पर्यायी मार्ग श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेवून एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग)
२. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी यस बँक जंक्शन ते श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन (पर्यायी मार्ग दांडेकर चौक येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड)
वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था
बसेस पार्क करण्याकरीता संपुर्ण सेनापती बापट मार्ग, माहिम रेल्वे स्थानक ते टिळक ब्रीज पर्यंत, रेती बंदर, लेडी जहांगिर रोड, रुईया जंक्शन ते पाच गार्डन ते सेंड जोसेफ स्कूल, नाथालाल पारेख मार्ग, सेंड जोसेफ स्कूल ते खालसा कॉलेज, आर. ए. के. ४ रोड, अरोरा जंक्शन ते लिज्जत पापड जंक्शन ते एडस् रुग्णालय पर्यंत, लोढा सार्वनिक वाहनतळ, सेनापती बापट मार्ग, कामगार मैदान, कोहिनुर सार्वजनिक वाहनतळ, इंडिया बुल फायनांन्स सेंटर सार्वजनिक वाहनतळ, रहेजा सार्वजनिक वाहनतळ, ग्लास्को जंक्शन ते दिपक टॉकी जंक्शन पर्यंत, सुदाम काळू अहिरे मार्ग, नारायण हर्डीकर मार्ग हार्डीकर जंक्शन ते सेक्रेट हार्ड हायुस्कूल पर्यंत, सासमिरा रोड.