आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत मुंबईच्या तरुणाची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 01:23 PM2017-11-09T13:23:51+5:302017-11-09T13:29:01+5:30
आंतररष्ट्रीय स्पर्धेत एका मुंबईकर तरुणाने बाजी मारल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुंबई - वन्यजीव विषयक सेंच्युरी एशिया या मासिकातर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत मुंबईत राहणार्या अभिषेक साटम या तरुणाच्या छायाचित्राला पुरस्कार मिळाला आहे.
या स्पर्धेच्या आर्ट इन नेचर या विभागात अभिषेकच्या स्टारफिश माशाच्या छायाचित्राला पारितोषिक मिळाले असून या विभागात केवळ एकच विजेता घोषित करण्यात येतो. नुकताच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाला. प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या स्पर्धेसाठी आशिया खंडातील जवळपास 5 हजाराहून अधिक छायाचित्रकारांनी फोटो पाठविले होते. रोख पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, कॅमेरा बॅग, एक जंगल सफारी असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. ‘सेंच्युरी आशिया’चे प्रमुख बिट्टू सहगल, प्रसिद्ध छायाचित्रकार स्टीव विंटर, कल्याण वर्मा, गणेश शंकर, डॉ. आशिष अंधेरिया, नयन खानोलकर, डॉ. प्रवीष पांड्या, सुमीत सेन, शेखर दत्तात्रीय यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत अभिषेक साटम म्हणाला की, ‘2015 साली माझ्या मित्राला हा पुरस्कार मिळाला होता. तेव्हाच मी ठरवलेलं या पुरस्कारावर आपलेही नाव कोरायचे. आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे. हा पुरस्कार मी माझ्या वडिलांना अर्पण करत आहे.’