मुंबईकरांचा सोमवार ‘ताप’दायक, आर्द्रता वाढल्याचा त्रास : सप्टेंबरमध्येच बसतोय ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 07:04 AM2017-09-12T07:04:46+5:302017-09-12T07:04:51+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर येथील वातावरणातील उकाडा चांगलाच वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्ण वारे, वाढती आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत असून, यात उत्तरोत्तर वाढच होत आहे.

Mumbaikar's Monday 'fever, humidity increased hardships:' October Heat 'sank | मुंबईकरांचा सोमवार ‘ताप’दायक, आर्द्रता वाढल्याचा त्रास : सप्टेंबरमध्येच बसतोय ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा  

मुंबईकरांचा सोमवार ‘ताप’दायक, आर्द्रता वाढल्याचा त्रास : सप्टेंबरमध्येच बसतोय ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा  

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर येथील वातावरणातील उकाडा चांगलाच वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्ण वारे, वाढती आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत असून, यात उत्तरोत्तर वाढच होत आहे. यात भर म्हणून की काय सोमवारी मुंबईवर पसरलेल्या धूलिकणांनी येथील वातावरण आणखीच प्रदूषित केले; आणि वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांचा सोमवार ‘ताप’दायक गेला.
जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. विशेषत: ऋतुचक्रावर याचा परिणाम होत असून, पावसाळा, थंडी आणि उन्हाळा असे सगळेच अस्थिर झाले आहे. विलंबाने दाखल होणारा मान्सून, कमी-अधिक होणारी थंडी आणि उष्ण वारे असे सर्वच घटक मनुष्याचे कंबरडे मोडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांपासून मुंबईचे वातावरण प्रदूषित होत असून, यात धूलिकणांची भर पडत असल्याने मुंबईचे वातावरण अधिकच ‘ताप’दायक होत आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानुसार, सोमवारी कुलाबा आणि सांताक्रुझ येथे अनुक्रमे ३३.४, ३३.५ एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. येथील आर्द्रताही नव्वद टक्क्यांच्या आसपास पोहोचली असून, वाढती आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत आहे.

शहरातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. पृथ्वीचे तापमानही वाढत आहे. याला आपण सर्व जण जबाबदार आहोत. पृथ्वीचे तापमान दरवर्षी ०.२० अंश सेल्सिअसने वाढत आहे. पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढल्यानंतर मानवजात नष्ट होण्यास सुरुवात होईल. एकीकडे आपण पर्यावरणाची हानी करीत आहोत आणि दुसरीकडे प्रदूषण वाढवत आहोत. त्यामुळे दुप्पट गतीने आपण विनाशाकडे जात आहोत. मार्च २०१५मध्ये झालेल्या जागतिक पॅरिस करारात स्पष्ट सांगितले आहे की, पृथ्वीचे सरासरी तापमान १७५० सालच्या तुलनेने अजून दोन अंशांनी वाढले तर मानवजात नष्ट होणे अटळ आहे. तरीही लोक इतके गाफील का, असा सवाल पर्यावरणतज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांनी केला आहे.

त्वचेचे विकार होण्याची शक्यता
वाढत्या आर्द्रता आणि उष्णतेने मुंबईकरांचा पुरता ‘घाम’ निघाला. पण या वातावरणीय बदलांमुळे त्वचाविकार आणि अन्य आजार बळावण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. जर सतत फिरत असाल तर शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. त्याशिवाय, उलट्या, जुलाब, व्हायरल इन्फेक्शन, श्वसनाचे विकार, अति उन्हामुळे ‘हीट स्ट्रोक’ होऊ शकतात. त्यामुळे, लोकांनी सोबत पाणी ठेवले पाहिजे. बाहेरची थंड पेये टाळावीत, असे कन्सल्टंट फिजिशिअन डॉ. सागर कजबजे यांनी सांगितले. वाढत्या उन्हाचा त्रास शरीरासह त्वचेवरही होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे फंगस इन्फेक्शन होऊन शरीरावर लाल चट्टे उठू शकतात किंवा नायटा उठू शकतो. त्यामुळे उन्हात जास्त घट्ट कपडे टाळले पाहिजेत,अशी माहिती त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. किरण नाबर यांनी दिली. त्यामुळे डोक्यावर छत्री धरत, रुमाल बांधून, तोंडाला स्कार्फ लावून घरातून बाहेर पडणाºया मुंबईकरांना डॉक्टरांनी आहार आणि पोशाखाच्या बाबतीत काळजी घेण्याचे सुचविले आहे.

पुनर्वापरावर भर देणे गरजेचे

आजच्या तापमानाची गुन्हेगार मानवजातच आहे. आपल्याकडे अनेक सोयीसुविधा आहेत; सॅटेलाइटद्वारे हवामानात काय बदल होणार आहेत ते आपल्याला आधीच माहीत पडत असूनसुद्धा आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहोत. २९ आॅगस्टला जी घटना झाली त्यावर काही उपाययोजना का नाही केल्या? आजच्या तापमानवाढीचे कारण असे आहे की, आपल्या वापरात मिथेन गॅस आणि कार्बन डायआॅक्साईड या गॅसेसचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
आपण अपारंपरिक स्रोतांचा वापर केला पाहिजे जसे की, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच पुनर्वापरावर भर दिला पाहिजे. जेणेकरून आता जशी परिस्थिती झाली आहे तशी परिस्थिती पुन्हा होणार नाही, असे यंग इन्व्हायरमेंटलिस्ट प्रोगामच्या संस्थापिका एल्सी गॅब्रियल यांचे म्हणणे आहे.

घामाने त्रस्त असणा-या रुग्णांमध्ये वाढ
घामाने शरीराला खाज सुटणे, अतिघाम येणे, त्वचेवर चट्टे उठणे अशा प्रकारच्या तक्रारींचा सूर घेऊन येणाºया रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या वातावरणीय बदलांमुळे होणा-या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, अशी माहिती डॉ. नाबर यांनी दिली. त्याचप्रमाणे, नायटाचे संसर्ग झालेल्या रुग्णांमध्येही दिवसागणिक वाढ होताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Mumbaikar's Monday 'fever, humidity increased hardships:' October Heat 'sank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई