तलाव सुशोभीकरणासाठी नितीन देसाई मदतीस इच्छुक

By admin | Published: May 21, 2017 03:08 AM2017-05-21T03:08:19+5:302017-05-21T03:08:19+5:30

पवई तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून, दुसऱ्या

Nitin Desai wants to relax the lake | तलाव सुशोभीकरणासाठी नितीन देसाई मदतीस इच्छुक

तलाव सुशोभीकरणासाठी नितीन देसाई मदतीस इच्छुक

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पवई तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून, दुसऱ्या टप्प्यात प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेचा समावेश होण्याची शक्यता आहे.
पवई तलावाच्या आसपास अनेक झोपडपट्ट्या, इमारती व औद्योगिक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. या सर्व झोपडपट्ट्या, इमारती आणि औद्योगिक कंपन्यांमधील सांडपाणी या तलावात सोडले जात आहे. या मलजलामुळे तलावातील पाण्याचा दर्जा मात्र, खालावत चालला आहे. त्यामुळे पवई तलावाचे दोन टप्प्यांत सुशोभीकरण करण्यात येत आहे. आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणानंतर तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार, पावणेसात कोटी रुपये खर्च करून ही जलपर्णी काढण्यात येणार आहे. त्याबरोबरच तलावात प्रक्रिया न करता सोडले जाणारे मलमूत्र व सांडपाणी बंद करणे, कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया योजना राबविण्यात येणार आहे.

देसार्इंचा प्रस्ताव
पवई तलावाचे सुशोभीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे, परदेशातील तलावांप्रमाणे व्हावे, यासाठी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या कल्पनेतून कलाकृती साकारली आहे. त्याचे सादरीकरण देसाई यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासमोर केले. आयुक्तांनी त्यांची भेट घेतल्यानंतर हे सादरीकरण अन्य अधिकारी वर्गाला दाखवण्याची सूचना केली.
त्यानुसार, परदेशातील तलावांच्या धर्तीवरील पवई तलावाच्या सुशोभीकरणाचे संकल्पचित्र देसाई यांनी अधिकारी वर्गाला दाखवले. पवई तलावाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरणाचा प्रस्तावही देसाई यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते. दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करताना निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यामध्ये देसाई यांच्या संकल्पनेतील सूचनांचा विचार होण्याची शक्यता आहे.

असे होणार सुशोभीकरण
तलाव परिसरातील पदपथ व जमिनीवर निसर्गचित्र विकसित करणे, निरीक्षण व सुरक्षा यंत्रणा विकसित करणे, बगीचे व पदपथ बनवणे, तलावात संगीतमय कारंजे उभारणे, सुसर, मगर, फुलपाखरे यांच्यासाठी उद्यान विकसित करण्यासाठी अहवाल बनवणे, तलावातील जलपर्णी व इतर आक्षेपार्ह वनस्पतींना नष्ट करण्यासाठी उपाययोजना या कामांसाठी फ्रिश्मन प्रभू कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी चार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्यानुसार, सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे.

Web Title: Nitin Desai wants to relax the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.