'कुणीही श्रेय घेऊ नये, 40 आंदोलकांचं बलिदान लक्षात ठेवावं, जल्लोष करायचा नसतो'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 03:25 PM2018-11-29T15:25:35+5:302018-11-29T15:25:45+5:30
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी मुलांवर झालेल्या केसेस मागे घेण्याची मागणी आम्ही केली आहे.
मुंबई - मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. त्यावर बोलताना, ही श्रेय घेण्याची वेळ नाही. आपण आपली जबाबदारी पार पाडली आहे. परुंतु, काही राजकारणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे चुकीचं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच मराठा आरक्षणासाठी 40 जणांनी आपला जीव दिला, त्यांचं बलिदान लक्षात ठेवायचं असतं. त्यामुळे आज मी फेटा बांधला नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी आम्ही 8 दिवसांपासून तगादा लावला होता. त्यामुळेच, आम्ही 8 दिवस सभागृह चालू दिलं नाही, हेही तुम्हाला माहिती आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं. मात्र, 288 आमदारांनी एकमताने हे विधेयक पास केलं आहे. त्यामुळेच, आरक्षणाची मागणी पूर्णत्वाला गेली, असे म्हणत या आरक्षणाचा श्रेय सर्वांचच असल्याचे अजित पवार यांनी आझाद मैदानात जाऊन तेथील उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर बोलताना म्हटलं.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी मुलांवर झालेल्या केसेस मागे घेण्याची मागणी आम्ही केली आहे. ज्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वत:चा जीव दिला, त्यांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, अद्याप ती मदत मिळाली असून ती लवकरात लवकर मिळावी, अशीही मागणी केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच मराठ समाजात कुठही फूट पडेल असं काहीही करू नका. कारण, समाजाच्या एकोप्यामुळेच, सर्वांच्या प्रयत्नामुळे हे काम मार्गी लागल आहे. दरम्यान, यावेळी अजित पवार यांच्यासमवेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते.