आता अ‍ॅपवर ‘ऐका’ दिवाळी अंक!

By admin | Published: October 22, 2014 01:17 AM2014-10-22T01:17:19+5:302014-10-22T01:17:19+5:30

दिवाळी अंक वाचण्यासाठी वेळेचा अभाव असणाऱ्यांनाही आता दिवाळी अंकातील लेखांची मजा लुटता येणार आहे.

Now listen to the Diwali issue on the app! | आता अ‍ॅपवर ‘ऐका’ दिवाळी अंक!

आता अ‍ॅपवर ‘ऐका’ दिवाळी अंक!

Next

मुंबई : दिवाळी अंक वाचण्यासाठी वेळेचा अभाव असणाऱ्यांनाही आता दिवाळी अंकातील लेखांची मजा लुटता येणार आहे. टेक्नोसॅव्हींच्या जमान्यात दिवाळी अंकही आता अँड्रॉइड मोबाइलवर आॅडिओ रूपात उपलब्ध झाला आहे. ‘सुश्राव्य’ असे या आॅडिओ दिवाळी अंकाचे नाव असून तो प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करण्यात आला आहे.
धकाधकीच्या जीवनात दिवाळी अंक वाचण्यासाठी वेळ नसलेल्या सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू वाचकांसाठी हा अंक म्हणजे एक पर्वणी ठरेल, असे अ‍ॅपचे निर्माते राजेंद्र वैशंपायन यांनी सांगितले. वैशंपायन म्हणाले, ‘आज ७० टक्क्यांहून अधिक लोकांकडे अँड्रॉइड मोबाइल फोन आहेत. ट्रेन किंवा कारमध्ये प्रवास करताना दिवाळी अंक वाचणे कठीण आहे. याउलट दोन्ही प्रवासादरम्यान अनेक जण गाण्यांचा आस्वाद घेताना दिसतात. त्यातूनच आॅडिओ दिवाळी अंकाची संकल्पना मनात आली. संपूर्णपणे आॅडिओ रूपात असलेल्या या दिवाळीअंकात संगीत, कला, धार्मिक, साहित्य, बाल साहित्य असे विविध प्रकार ऐकण्यास मिळणार आहेत.
दिवाळी अंकाच्या वाचकांना केवळ गुगल किंवा प्ले स्टोअरवर सुश्राव्य टाइप केल्यास हा दिवाळी अंक मोफत डाऊनलोड करता येईल, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘या अंकातील आॅडिओ शुद्ध मराठीत आहेत. संपूर्ण अंकाची मेमरी १०० एमबीपर्यंत आहे. मात्र अ‍ॅपची मेमरी केवळ ५ एमबी आहे. शिवाय संपूर्ण मेमरीऐवजी वाचकांना हव्या असलेल्या प्रकारातील आॅडियो फाइल डाऊनलोड करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे १०० एमबीपर्यंत मेमरी खर्ची घालण्याची गरज नाही. ज्या प्रकारातील फाइल हव्या असतील, त्या डाऊनलोड करता येतील. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.’ अ‍ॅपच्या स्वरूपात आॅडिओ दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा हा पहिलाच प्रयोग सुश्राव्यने केल्याचा दावा वैशंपायन यांनी केला आहे. शिवाय हा प्रयोग सुरूच ठेवणार असून एकदा डाऊनलोड केलेले अ‍ॅप प्रत्येक महिन्याला अपडेट केल्यास नवे लेख ऐकण्यास मिळतील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Now listen to the Diwali issue on the app!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.