नालासोपारा स्फोटकांप्रकरणी घाटकोपरमधून एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 05:06 AM2018-08-26T05:06:52+5:302018-08-26T05:07:35+5:30
एटीएसची कारवाई; अविनाश पवारचा कटात सहभाग?
मुंबई : नालासोपाऱ्यात जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी माझगाव डॉकमधील कर्मचारी अविनाश पवार (३०) याला शुक्रवारी रात्री राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घाटकोपरमध्ये अटक केली. बॉम्ब बनविण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. राऊतसह अटक केलेल्या इतरांनी बॉम्बद्वारे विविध ठिकाणी स्फोट घडविण्याचा कट आखला होता. त्यात पवार सहभागी असल्याच्या शक्यतेतून एटीएसने तपास सुरू केला आहे. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी ही पाचवी अटक आहे.
घाटकोपर भटवाडी परिसरात पवार आईसोबत राहतो. त्याच्या बहिणीचा विवाह झाला आहे. त्याचे स्थानिक शाळेतच शिक्षण झाले. त्याने पाइप फीटरचा डिप्लोमा केला आहे. त्याने माझगाव डॉकमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. तेथेच भरतीदरम्यान त्याला नोकरी मिळाली. त्याचबरोबर त्याने नुकताच आॅनलाइन भाजी विक्रीचाही व्यवसाय सुरू केला होता. तो शिवभक्त आहे. शिवज्योत घेऊन पायी गडावर जाणे आदी उपक्रमांत त्याचा पुढाकार असे. तो राहत असलेल्या परिसरात संभाजी भिडे यांचे शिवप्रतिष्ठानचे कार्यालय आहे. येथील कार्यक्रमांनाही त्याची हजेरी असे. अटक केलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर यांच्या तो दोन वर्षांपासून संपर्कात होता. त्यांच्याकडून जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात पवारचाही सहभाग समोर आला आहे.
३१ पर्यंत पोलीस कोठडी
अविनाश पवारला शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या घरातून सीपीयू, मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
माझगाव डॉकही होते निशाण्यावर?
माझगाव डॉक हे देशातील एक महत्त्वाचे जहाजबांधणीचे ठिकाण आहे. तेथे नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या बनवतात. तेल उत्खननासाठी आवश्यक जहाजेही बनविली जातात. तेथेही स्फोट घडविण्याचा कट रचला होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे.