पालखीविना शिमगोत्सव

By admin | Published: March 11, 2017 08:22 PM2017-03-11T20:22:43+5:302017-03-11T20:28:31+5:30

राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला ‘आडिवरे’ हे गाव वसलेले आहे.

Palkhi Vina Shimgotsav | पालखीविना शिमगोत्सव

पालखीविना शिमगोत्सव

Next

 हे गाव १२ वाड्यांचे असून, या वाड्यांपैकी वाडापेठ या ठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा हा कोकणातील एकमेव शिमगोत्सव आहे.
हा शिमगोत्सव फाल्गुन शुद्ध दशमीला सुरु होतो आणि धुलिवंदनाला संपतो. या खेळाच्या सुरुवातीला म्हणजे फाल्गुन शुद्ध दशमीला रात्री गावातील व्यवस्थापक व अन्य ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमतात. यावेळी देवीला कौल लावण्याची प्रथा आहे. हे कौल लावण्याचे काम मंदिरातील देवीची पूजा करणारे गुरव करतात. देवीचा कौल मिळाल्यावर खऱ्याअर्थाने या खेळाला सुरुवात होते. कौल मिळाल्यावर मंदिरातील सर्व देवांच्या मूर्तीवर गुलाल टाकला जातो. हा मान गावातील व्यवस्थापक म्हणजेच येथे असणाऱ्या शेट्ये घराण्याकडे आहे. त्यानंतर मंदिराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या छोट्या मंदिरासमोर जाऊन त्या देवतेला हाक मारण्याची प्रथा आहे. या मंदिराला ‘चव्हाटा’ म्हटले जाते. नंतर ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थ तेथूनच जवळ असलेल्या भगवती मातेच्या मंदिरापाशी जातात व तेथील जखणीला हाक मारतात. असे म्हणतात की, ‘या खेळात ती सुद्धा सामील असते आणि तिच्या सहभागाने या खेळाला वेगळाच रंग चढतो.’ नंतर ‘चल चल जखणी खेळायला’ या गाण्याच्या तालासुरात ग्रामस्थ परत मागे फिरतात व शेट्ये यांच्या घराजवळ काहीवेळ थांबतात. तेथून हे ग्रामस्थ पुन्हा मंदिरात येतात. मग मंदिरात देवीसमोर गाऱ्हाणे घातले जाते. त्यानंतर पोफळ खेळवण्यास सुरुवात होते. यावेळी पोफळीचा जो खालील जमिनीतील भाग (मुदा) असतो तो सांभाळण्याचा मान हा फक्त तेथील चर्मकार समाजाचा आहे. पाचव्या रात्री म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या पहाटेला होम केला जातो. सहाव्या दिवशी म्हणजेच ‘धुलिवंदन’ला होळीचा सण साजरा करतात.
होळीसाठी १२ वाड्यांपैकी एका वाडीचे ठिकाण निश्चित केले जाते. १२ वाड्यांतील सर्व ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमतात. तेथून ढोल-ताशांच्या गजरात व देवीचा अब्दागीर घेऊन स्वारी निघते व निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचते. तेथे गेल्यावर होळीसाठी पोफळ निवडली जाते. मग शेट्ये त्याची पाहणी करुन त्यावर गुलाल टाकतात व ती निश्चित करतात. त्यानंतर तिची पूजा करुन कुणबी समाजातील लोक ती खोदण्यास सुरुवात करतात. पोफळ बाहेर काढल्यावर त्याचा मुदा तासण्याचे काम सुतार समाज करतो. नंतर वेत्ये येथील भंडारी समाज मुदा सांभाळतात. देवीची मूर्ती प्रथम त्यांनी आणून दिली, म्हणून ठरलेल्या ठिकाणाहून होळीचा मुदा सांभाळण्याचा मान त्यांच्याकडे आहे. तर पोफळीच्या शेंड्याकडे तिवरे गावातील लोक असतात. मग ढोल-ताशांच्या तालावर नाचत ती वाडापेठ येथील महापुरुषाच्या ठिकाणी आणली जाते. तेथे आल्यावर वेत्ये येथील ग्रामस्थ आपला मान वाडापेठमधील चर्मकार समाजाकडे आलिंगन देऊन सुपूर्द करतात. नंतर ही होळी तेथून नाचवत मंदिरात आणली जाते. तेथून ती उभी करावयाची असते, त्या ठिकाणी आणली जाते. यावेळी होळीवर देवीचे निशाण लावले जाते. हे निशाण आणण्याचे, सजवण्याचे काम परिट समाज करतो. त्यानंतर ती मोठ्या उत्साहाने उभी केली जाते.

आडिवरे येथील देवीच्या उत्सवात संपूर्ण गाव सहभागी होत असतो. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळीदेखील उत्सवासाठी गावात दाखल होतात. देवीच्या ‘शिंपणे’ उत्सवाने शिमगोत्सवाची सांगता होते. या ‘शिंपणे’ उत्सवाव्यतिरिक्त गावात वेगळी रंगपंचमी खेळली जात नाही. पारंपरिक पद्धतीनेच ‘शिंपणे’ उत्सव साजरा केला जातो.
आडिवरे - वाडापेठ येथे स्थापन करण्यात आलेली देवीची मूर्ती वेत्ये या गावी सापडल्याने या गावाला देवीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
कोकणात शिमगोत्सवाच्या काळात अनेक देवदेवतांच्या पालख्या या काळात दर्शनासाठी बाहेर पडतात. मात्र, याला अपवाद आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची पालखी आहे. शिमगोत्सवात देवीची पालखी बाहेर पडत नाही तर याठिकाणी पाच दिवस पोफळी नाचविण्याचा अभिनव खेळ खेळला जातो. देवीची पालखी केवळ नवरात्रोत्सव काळातच मंदिरात फिरवली जाते.


अरुण आडिवरेकर, रत्नागिरी

Web Title: Palkhi Vina Shimgotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.