प्रकाश आंबेडकर - ओवेसींची युती; 'मिशन २०१९' साठी महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण

By यदू जोशी | Published: September 15, 2018 02:19 PM2018-09-15T14:19:25+5:302018-09-15T14:43:47+5:30

प्रकाश आंबेडकर यांचा अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये चांगला प्रभाव आहे. एमआयएमची मुख्य भिस्त मुस्लिम मतदारांवर आहे. २०१४ मध्ये दोन आमदार निवडून आणून पक्षाने महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश मिळविला.

Prakash Ambedkar Asaduddin Owaisi to come together for next year's elections | प्रकाश आंबेडकर - ओवेसींची युती; 'मिशन २०१९' साठी महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण

प्रकाश आंबेडकर - ओवेसींची युती; 'मिशन २०१९' साठी महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण

Next

मुंबईः अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा भारिप-बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम यांच्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार असून २ ऑक्टोबरला औरंगाबादच्या जाहीर सभेत तशी घोषणा करण्यात येणार आहे.

राज्य विधानसभेत एमआयएमचे दोन आमदार आहेत. भायखळ्याचे वारिस पठाण आणि औरंगाबाद (मध्य)चे सय्यद इम्तियाज जलिल. भारिप-बहुजन महासंघाचा एकच शिलेदार विधिमंडळात आहे. बाळापूरचे (जि.अकोला) बळीराम सिरसकर गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते. प्रकाश आंबेडकर यांचा अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये चांगला प्रभाव आहे. दलितांबरोबरच इतर जातींना जोडून राजकारण करण्याचा त्यांचा पॅटर्न विशेषत: अकोला जिल्ह्यात बऱ्यापैकी यशस्वी झाला. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही त्यांच्या समर्थकांची संख्या बऱ्यापैकी आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी आता एमआयएमसोबत जाण्याची भूमिका घेतल्याने रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांनी एकत्र येण्याची उरलीसुरली शक्यताही संपुष्टात आली आहे. रिपाइंच्या एका गटाचे अध्यक्ष रामदास आठवले आधीच भाजपासोबत आहेत, तर दुसरे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे (पीरिपा) काँग्रेसच्या जवळचे आहेत. डॉ.राजेंद्र गवई (गवई गट) अलीकडे काँग्रेसवर टीका करतात पण त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट झालेली नाही. 

एमआयएमची मुख्य भिस्त मुस्लिम मतदारांवर आहे. नांदेड महापालिकेत एकेकाळी ११ नगरसेवक निवडून आल्यानंतर या पक्षाची जोरदार चर्चा सुरू झाली. २०१४ मध्ये दोन आमदार निवडून आणून पक्षाने महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश मिळविला. आंबेडकर यांना मानणारा दलित मतदार आणि एमआयएमचा मुस्लिम मतदार असे समीकरण जुळले तर ही युती मर्यादित का होईना पण चमत्कार करू शकेल. या युतीमुळे एरवी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाणाऱ्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपा-शिवसेनेला होऊ शकेल. पण अकोला, नांदेड, बुलडाणा अशा काही जिल्ह्यांमध्ये भाजपा-शिवसेनेलादेखील फटका बसू शकतो.

अ‍ॅड.आंबेडकर यांनी दलित नेतृत्वाबाबत विशेषत: गेल्या दोन-तीन वर्षांत इतर रिपाइं नेत्यांना चर्चेत राहण्याबाबत निश्चितच मागे टाकले आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी ते विशेषत्वाने जाणवले. प्रसिद्धी माध्यमांमध्ये आंबेडकरच चर्चेत होते. मात्र, आंबेडकर यांनी या निमित्ताने दलित मतदारांच्या मनाची पकड घेतली आहे का हे मतदानाच्या माध्यमातून अद्याप दिसलेले नाही. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आंबेडकर यांनी दोन-अडीच डझन पक्षांची मोट बांधली होती पण त्यातून मतांचे पाणी बाहेर काही आले नाही. आंबेडकर यांच्या एकूण राजकीय वाटचालीचा विचार केला तर त्यांच्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा जास्त फायदा भाजपालाच होत आला आहे.

Web Title: Prakash Ambedkar Asaduddin Owaisi to come together for next year's elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.