भिडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्याच जिवाला धोका- प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:32 AM2018-01-11T01:32:39+5:302018-01-11T01:32:48+5:30

संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या कार्यकर्त्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांच्याच जिवाला धोका निर्माण झाल्याचा दावा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. हिंदुत्ववादी संघटनांना वेळीच आवरले नाही, तर त्यांचे दहशतवादी गटात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

Prakash Ambedkar risks his life for supporters of Bhide | भिडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्याच जिवाला धोका- प्रकाश आंबेडकर

भिडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्याच जिवाला धोका- प्रकाश आंबेडकर

Next

मुंबई : संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या कार्यकर्त्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांच्याच जिवाला धोका निर्माण झाल्याचा दावा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. हिंदुत्ववादी संघटनांना वेळीच आवरले नाही, तर त्यांचे दहशतवादी गटात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून सुरू असलेले ‘कोम्बिंग आॅपरेशन’ थांबविण्याची मागणी करतानाच अ‍ॅड.आंबेडकर यांनी भिडे गुरुजींवर पुन्हा एकदा निशाणा साधला. भिडे गुरुजींच्या एका समर्थकाने १ जानेवारीच्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गिरीश बापट आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्या हत्येला प्रोत्साहन देणारे पोस्ट केले होते. रावसाहेब पाटील या तरुणाच्या फेसबुक पोस्टचे फोटोही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दाखविले होते. मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजींच्या संघटनांवर कोणाचे बंधन नाही. आपला हेतू साध्य झाला नाही, तर या संघटनांचे कार्यकर्ते थेट हत्येची भाषा करतात. त्यामुळे अशा संघटना प्रोत्साहन न देता वेळीच त्यांना आवर घालण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरेगाव भीमाच्या दंगलीत ९ कोटींचे नुकसान
पुणे : कोरेगाव भीमा येथे १ व २ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे सुमारे ९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल शिरुर तहसीलने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
दंगलीमध्ये सुमारे नऊ कोटी ४८ लाख ५५ हजार ९६५ रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. दंगेखोरांनी ११६ चारचाकी वाहने,
९५ दुचाकी, १८ घरे, तीन बसेस, आठ ट्रक, ७६ हॉटेल आणि १४ गॅरेजचे नुकसान केले आहे.

आंबेडकरी संघटनांच्या मोर्चावर दगडफेक
बेळगाव : कोरेगाव भीमा येथील दंगल, विजापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी काढलेल्या मोर्चावर बुधवारी समाजकंटकांनी दगडफेक केली.
मोटारसायकलवरून आलेल्या काही समाजकंटकांनी सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील शोरूमच्या काचा फोडल्या. बसवरही दगडफेक झाली. आंबेडकरी संघटनांतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दगडफेकीच्या निषेधार्थ खडे बाजार पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.

कोरेगाव भीमा प्रकरणावर ‘इस्लामी हिंद’ची फुंकर!
मुंबई: कोरेगाव भीमा दंगलीनंतर समाजात निर्माण झालेल्या सामाजिक तेढीवर फुंकर घालण्यासाठी जमाअत-ए- इस्लामी हिंद या संघटनेने पुढाकार घेतला आहे. राज्यात एकात्मता व बंधुतेचे वातावरण कायम राहून जातीय व धार्मिक द्वेष दूर व्हावा, यासाठी येत्या शुक्रवार (दि.१२) राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यभरातील ६०० ठिकाणी विविध माध्यमातून सामाजिक समता व बंधुतेचा प्रसार करण्यात येणार आहे. २१ जानेवारीपर्यंत चालणाºया या मोहीमेत ५० लाख नागरिकांशी संवाद साधण्यात येईल, असा दावा संघटनेचे सचिव अस्लम गाझी व
डॉ. सलीम खान यांनी दिली.

‘कबीर कलामंच सदस्यांवर खोटा गुन्हा’
पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी हिंदुत्ववाद्यांवर आरोप होतात म्हणून, जातीअंताच्या लढाईसाठी एल्गार पुकारणाºया कबीर मंचच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या परिषदेच्या संयोजनात अनेक संघटना असताना केवळ कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली, असा आरोप कबीर कलामंच, स्वराज अभियान आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारी येथे करण्यात आला.
एल्गार परिषदेचे संयोजक आकाश साबळे, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष म. ना. कांबळे, स्वराज अभियानाचे इब्राहिम खान, ज्योती जगताप, भारतीय बहुजन महासंघाचे किशोर कांबळे, सिद्धार्थ दिवे, दीपक डेंगळे, सागर गोरखे, रुपाली जाधव यांनी भूमिका मांडली.
साबळे म्हणाले, दरवर्षी एक जानेवारीला कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. त्यावेळी ही घटना घडली. मात्र, एल्गार परिषदेमुळे हा प्रकार झाला असल्याची चर्चा होत होती. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पोलीस आयुक्तांना पत्रही दिले होते. त्यानंतर ८ जानेवारीला परिषदेच्या संयोजकांपैकी केवळ कबीर कला मंचच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. वास्तविक या परिषदेच्या आयोजनात भारिप बहुजन महासंघासह काही संघटनांनी ही परिषद आयोजित केली होती. कोरेगाव भीमाची घटना एल्गारच्या माथी मारण्याचे काम ब्राम्हणी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी सुरु केले आहे.

Web Title: Prakash Ambedkar risks his life for supporters of Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.