लोकसहभागातून बालमजुरी रोखणे शक्य
By Admin | Published: June 12, 2015 05:50 AM2015-06-12T05:50:12+5:302015-06-12T05:50:12+5:30
दिवसेंदिवस बालकामगारांच्या कारवाईत वाढ होत असताना दिसते. यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस, सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांसोबत
मुंबई : दिवसेंदिवस बालकामगारांच्या कारवाईत वाढ होत असताना दिसते. यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस, सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांसोबतच लोकसहभाग महत्वाचा आहे, असे बालहक्क विभागाचे उपायुक्त प्रविण पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. नागरीकाच्या दक्षतेबरोबर स्वत:च्या स्वार्थासाठी बालकामगारांना राबविणाऱ्यांनी याचा विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
बालकामगार प्रथा अजूनही भारतातील वस्तुस्थिती आहे. ती आपण एक तर पूर्णपणे स्विकारलेली नाही किंवा त्यावर समाधानकारकपणे उपाययोजनाही केलेली नाही. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, नेपाळ, मध्य प्रदेश येथून बालकामगारांना मुंबईत कामानिमित्त आणले जाते. यातल बरेचसे कामगार हे परिस्थितीअभावी येताच तर अनेकांना स्वार्थी भावनेने आणले जाते. विणकाम, प्लास्टीक कटींग, कारखाना, केमिकल गाळे अशी नानाविध कामे या चिमुकल्यांकडून करुन घेतली जातात. १२-१२ तास काम करुनही योग्य मोबदला न देता दोन वेळच्या जेवणासाठीही त्यांचे हाल केले जातात. जागतिक बालकामगार दिनानिमित्ताने नागरिकांनी याबाबत दक्ष राहणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. पोलीस अमंलबजावणी पथकाने केलेल्या कारवाईत २०१३ मध्ये मुंबईत ३२९ बालकामगारांची सुटका करण्यात आली होती. त्यापाठोपाठ २०१४ मध्ये ८४६ तर २०१५ आतापर्यंत ६२९ बालकामगारांची सुटका करण्यात आली होती. आकडेवारीनुसार, दिवसेंदिवस मोठ्या संख्येने बालकामगारांची मुंबईतून सुटका करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळत आहे.