पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री फार मोठे नाहीत, त्यांना आम्ही झुकवू शकतोः प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 04:56 PM2018-03-26T16:56:49+5:302018-03-26T16:56:49+5:30
जनता हीच देशातील सर्वोच्च ताकद आहे.
मुंबई: पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे आहेत, हे मला मान्य नाही, असे विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच आंबेडकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावले होते. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या आंदोलनाला तुर्तास स्थगिती देत फडणवीस सरकारला भिडेंना अटक करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला.
प्रसारमाध्यमांना याबद्दल माहिती देताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे आहेत, असे मला वाटत नाही. जनता हीच देशातील सर्वोच्च ताकद आहे. आमच्याकडे ती ताकद आहे आणि आम्ही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना त्यासमोर झुकायला भाग पाडू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
भारिप बहुजन महासंघाच्या 10 जणांच्या शिष्टमंडळाने यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. संभाजी भिडेंना अटक करा, अन्यथा सरकारनं याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
भिडेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींना फूस आहे की भिडे मोदींना फूस लावतायत हे पाहावं लागेल. संभाजी भिडे आरोपी नंबर एक आहेत एकबोटे आरोपी नंबर दोन आहेत. आरोपी 2 वर कारवाई होते तर आरोपी एकवर का नाही ?, असा प्रश्नही आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. भिडे यांना अटक करायची असेल तर रावसाहेब पाटील यांची पोस्ट आहेच. त्यावर मुख्यमंत्र्यांना मारून टाका, असं लिहिलं होतं. त्यावर संभाजी भिडेंचा फोटो होता. रावसाहेब पाटील यांना अटक करा त्यांच्यापासून भिडेंपर्यंत पोहोचता येईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.