अभिनय कट्टा लीग करणार नाट्यसंमेलनाचा प्रचार
By Admin | Published: February 14, 2016 03:05 AM2016-02-14T03:05:37+5:302016-02-14T03:05:37+5:30
ठाण्यात शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाला रसिकांची गर्दी व्हावी म्हणून त्या संमेलनाचा वेगवेगळ्या मार्गाने प्रचार करण्यासाठी आता अभिनय कट्टाही सरसावला
ठाणे : ठाण्यात शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाला रसिकांची गर्दी व्हावी म्हणून त्या संमेलनाचा वेगवेगळ्या मार्गाने प्रचार करण्यासाठी आता अभिनय कट्टाही सरसावला आहे. सध्याच्या क्रिकेटच्या वातावरणाचा लाभ घेत रविवारी त्या माध्यमातून आगळ्या पद्धतीने प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.
अभिनय कट्ट्यांतर्फे दरवर्षी कलाकारांचे अंडरआर्म क्रिकेटचे सामने होतात. रविवारी होणाऱ्या ए.के.सी.एल.मध्ये नाट्यसंमेलनाचा प्रचार केला जाईल. सहभागी होणाऱ्या आठ संघांना नटसम्राट, शंभुराजे, तो मी नव्हेच, आॅल दी बेस्ट, वस्त्रहरण, कट्यार काळजात घुसली, सही रे सही, जांभूळ आख्यान अशी नावे देण्यात आली आहेत.
संघाच्या नावाचे प्रतीक म्हणून त्या संघातील एक खेळाडू बक्षीस समारंभाला त्या वेशभूषेत उपस्थित राहणार आहे. विजेते, उपविजेते अशा सन्मानचिन्हांनाही ठाण्यातील ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मींची म्हणजेच मामा पेंडसे, अशोक साठे, शशी जोशी, चंदू पारखी, केशवराव मोरे, श्याम फडके, स.पां. जोशी यांची नावे देऊन त्यांची स्मृती जपण्याचा प्रयत्न होणार आहे. कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांची ही संकल्पना असून सामन्यांचे संयोजन खासदार राजन विचारे यांनी केले आहे.