'राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये;आम्ही सामूहिक प्रदेशाध्यक्षपदाचे राजीनामे देतो'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 03:12 PM2019-05-25T15:12:26+5:302019-05-25T15:21:07+5:30
राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुठलंही प्रश्नचिन्ह नाही. राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत
मुंबई - काँग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. राहुल गांधी यांनी पदावर राहावं. विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याची गरज आहेत ते नेतृत्वाने करावे. माझ्यासह इतर राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी सामुहिक राजीनामे द्यावेत. पराभवाचं खापर राहुल गांधी यांच्यावर फोडता कामा नये असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी सांगितले.
देशभरात काँग्रेसचा झालेला पराभव पाहता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या कार्यकारणीत ठेवल्याचं सांगितलं जातंय. काँग्रेस कार्यकारणीने राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला आहे. सध्या दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक सुरु आहे.
कमलनाथ यांनीही राहुल गांधी यांचा बचाव करत म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचे म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं गेले मात्र काँग्रेसला अपेक्षितपणे तसं करता आलं नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुठलंही प्रश्नचिन्ह नाही. राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत आणि राहतील असं कमलनाथ यांनी सांगितले.
'वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम; नुकसान आघाडीचं फायदा युतीला' @AshokChavanINChttps://t.co/jfOYGj3sGS
— Lokmat (@MiLOKMAT) May 25, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये देशभरात काँग्रेसचे फक्त 52 खासदार निवडून आले आहेत. 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपाला मिळालेलं यश यंदाच्या निवडणुकीत वाढलं असल्याचं चित्र निकालात पाहायला मिळालं. भाजपाच्या जागा वाढून स्वबळावर त्यांनी 303 जागा जिंकल्या आहेत. तर अनेक राज्यात काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसने अवघी एक जागा जिंकली आहे. स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही नांदेड मतदारसंघातून पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं मंथन करावं लागेल असं अशोक चव्हाण म्हणाले.
राज्यात अनेक ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने लाख-दिड लाख मते घेतली. याचा थेट फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना बसला. राज्यातील 8 ते 10 जागा अशा होत्या. ज्याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार वंचितने घेतलेल्या मतांमुळे पडले आहेत. त्यामुळे निवडणुकीपर्वी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करुन आघाडीत सामावून घेतलं असतं तर नुकसान झालं नसतं असं बोललं जातं आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होती. आघाडीचं नुकसान करुन युतीला फायदा पोहचविण्यासाठी वंचित बहुजनने राज्यात उमेदवार उभे केले अशी टीका अशोक चव्हाणांनी केली आहे.