राज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 01:14 PM2018-08-14T13:14:50+5:302018-08-14T13:24:16+5:30

राज ठाकरे थेट आणि नेमकं बोलतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. आत्तापर्यंत त्यांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांमध्ये दम होता. पण.....

Raj Thackeray point out at negligence at irrigation but what is the contribution of MNS | राज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...

राज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...

Next

पाणी तहान भागवतं आणि बळीराजा भूक. पाणी म्हणजे जीवन आणि शेतकरी म्हणजे जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अन्नाचा निर्माता. त्यामुळे या दोन्हींची किंमत किती मोठी आहे याचा अंदाज आपण सहज बांधू शकतो. पण, महाराष्ट्राने ती ओळखली का, हा खरोखरच प्रश्न आहे. अन्यथा, राज्यात शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाचा प्रश्न इतका गंभीर झाला नसता. खरं तर, या विषयावर बरीच चर्चा आधीही झालीय, अगदी सत्तांतरही झालंय. पण, रविवारी 'पानी फाउंडेशन'च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सिंचनाच्या प्रश्नावरून राजकीय नेतेमंडळींची जी 'जिरवाजिरवी' झाली, त्या निमित्ताने चर्चेचं 'ठिबक' पुन्हा सुरू झालंय.

...जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात दुष्काळ संपला असता - राज ठाकरे

गेल्या साठ वर्षांत जलसंधारणात जेवढं पाणी मुरलं तेवढ्या पाण्याने राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता, आमिर खानला जे जमलं ते आत्तापर्यंतच्या कुठल्याच सरकारांना का जमलं नाही?, सरकारी अधिकारी आमिरसोबत काम करतात, पण सरकारसोबत का करत नाहीत?, असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारले आणि या चर्चेचा नारळ फुटला. कारण, राज यांनी आधीच्या आणि आजच्या सरकारसमोरच - अर्थात माजी उपमुख्यमंत्री-जलसंपदामंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर बसलेले असतानाच हा 'स्ट्राइक' केला होता. त्यांच्या या मुद्द्यांना उपस्थित गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारण, त्यांचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं. त्यात चुकीचं काहीच नव्हतं. महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेती आणि सिंचनासाठी मोठी तरतूद केली जाते. त्यातील खरंच शेतकऱ्यांपर्यंत किती निधी पोहोचतो, या प्रश्नाचं उत्तर भल्याभल्यांनाही सापडलेलं नाही. सिंचन घोटाळ्याबद्दल तर न बोललेलंच बरं. त्याचं पुढे काय झालं हेही देवच जाणे. म्हणूनच, राज ठाकरेंनी आजी-माजी सरकारांना मारलेला टोला सगळ्यांनाच आवडला. 

राज ठाकरे थेट आणि नेमकं बोलतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. आत्तापर्यंत त्यांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांमध्ये दम होता, याबद्दल कुणाचं दुमत नाही. पण त्याचवेळी, 'काही जण फक्त बोलघेवडे असतात, त्यांना केवळ सभा घेऊन जायचं असतं', ही अजित पवार यांची टिप्पणीही अनेकांना पटणारी आहे. कारण, राज ठाकरे यांनी मनसे स्थापन करून १२ वर्षं झाली असली, तरी ते त्याहीआधीपासून राजकारणात सक्रिय होते. शिवसेनेचं नेतेपद त्यांच्याकडे होतं, अनेक भागांची जबाबदारी होती. तेव्हा, किंवा अगदी मनसे स्थापन झाल्यानंतरही राज यांनी स्वतः किंवा त्यांच्या शिलेदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, सिंचनाच्या समस्येसाठी काय केलं?, असा प्रश्न कुणी विचारल्यास मनसैनिकांकडे काय उत्तर आहे? सत्ता कुठे आहे आमच्याकडे, असा प्रतिप्रश्न ते रागाने करतील, पण आपलेही १-२ नव्हे तर १३ आमदार होते हे सोयीस्करपणे विसरतील. 

काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

कुठल्याच राजकीय पक्षाची पाठराखण करण्याचा किंवा कुणाची बाजू घेण्याचा इथे प्रश्नच नाही. कारण, सगळेच कमी-अधिक फरकाने सारखेच आहेत. पण, राज ठाकरे यांनी या विषयाला हात घातलाच आहे, तर त्यांच्याकडूनही असलेल्या अपेक्षा सांगण्याचा हा प्रयत्न आहे. 

राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत. समोरच्याला प्रभावित करणारी शैली त्यांच्याकडे आहे. 'इव्हेन्ट मॅनेजमेंट'च्या बाबतीत तर त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यांनी 'मनसे' ठरवलं असतं तर 'पानी फाउंडेशन'इतकीच, किंबहुना त्यापेक्षाही मोठी चळवळ राज ठाकरेंना उभी करता आली असती. हा झाला सामाजिक भाग. पण, राजकीयदृष्ट्याही मनसेनं शहरी भागांवरच भर दिला आणि आजही देत आहेत. ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष झालं का, असा प्रश्न कुणी विचारला की राज ठाकरे चिडतात. ज्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालीय त्यांना हे प्रश्न विचारता का?, असं ते विचारतात. त्याचं उत्तर 'हो' असं आहे. राज्यातील प्रत्येक समस्येबाबत संबंधित नेत्यांना त्या-त्या वेळी प्रश्न विचारले गेलेत. आणि हो, दरवेळी प्रतिप्रश्न हे प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. कारण, जेव्हा उत्तर नसतं तेव्हा प्रतिप्रश्न केले जातात, हेही राज यांनी लक्षात घ्यायला हवं.   

पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यात पडलेला दुष्काळ, लातूरला पाठवण्यात आलेली वॉटर ट्रेन, देवेंद्र सरकारने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना, त्यानंतर स्थापन झालेली 'नाम' आणि 'पानी फाउंडेशन'... दोन वर्षांत पुलाखालून बरंच पाणी गेलंय. यात मनसे कुठे होती? म्हणूनच तर,  'श्रमदानासाठी तुम्हीही या', हे गावकऱ्यांना सांगावं लागलं. त्यावर, पुढच्या वर्षी येईन, असं आश्वासन राज यांनी दिलंय. हा शब्द त्यांनी पाळल्यास पक्षाच्या 'नवनिर्माणा'लाही नक्कीच हातभार लागेल.

Web Title: Raj Thackeray point out at negligence at irrigation but what is the contribution of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.