एसटी महामंडळ खासगीकरणाचा घाट हाणून पाडणार - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 02:24 PM2018-02-12T14:24:44+5:302018-02-12T14:25:56+5:30
एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट हाणून पाडला जाईल'', असे आश्वासन राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहे.
कल्याण - ''एसटी कामगारांनी त्यांच्या वेतनवाढीसाठी केलेल्या संपाच्या पश्चात सरकारने कामगारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांची वेतनवाढ अद्याप कामगारांना मिळालेली नाही. त्याचबरोबर वेतनवाढीचा करारदेखील केलेला नाही. कामगारांना वेतनवाढ न देता एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे'',अशी व्यथा मनसे राज्य परिवहन कामगार सेनेच्या पदाधिका-यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मांडली.
यावेळी ''सगळी माहिती मला आणून द्या. एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट हाणून पाडला जाईल'', असे आश्वासन राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहे. त्याचबरोबर यासगळ्या मुद्यांचा समाचार गुडीपाडव्याच्या सभेत घेतला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
रविवारी ( 11 फेब्रुवारी ) ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थाही मनसे राज्य परिवहन कामगार सेनेच्या पदाधिका-यांसोबत ठाकरे यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला सरचिटणीस मोहन चावरे, कार्याध्यक्ष विकास आकलेकर, महादेव म्हस्के, राजू घरत, अमरावतीहून प्रदीप गायकी, सुदर्शन पझई, विनायक इंगोले, सुनिल इंगोले, बुलढाण्याहून राजेश इंगळे आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
पदाधिका-यांनी ठाकरे यांच्यासोबत चर्चा करताना महत्त्वाचा मुद्दा सांगितला की, एसटी कर्मचा-यांच्या वेतन वाढीचा करार 2012 साली झाली होती. त्याची मुदत 2016 साली संपुष्टात आली. मुदत संपुष्टात येऊन दोन वर्षे होत आहे. तरीदेखील वेतनवाढीचा करार केला जात नाही. हा करार मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या आठमुठे धोरणामुळे होत नाही याकडे पदाधिका-यांनी लक्ष वेधले. राज्यभरातील बस डेपोच्या स्वच्छतेसाठी एसटी महामंडळाने साडे चार हजार कोटी रुपये खर्चाचे कंत्रट दिले आहे. यापूर्वी कामगारांच्या गणवेशावर सात कोटी रुपये खर्च होत होता. आता हाच खर्च 73 कोटी रुपये दाखविण्यात येत आहे.
याशिवाय शिवशाही बस प्रकल्पाच्या नावाखाली महामंडळाच्या ताफ्यात दीड हजार बसेस दाखल झालेल्या आहे. त्यापैकी 500 बसेस महामंडळाच्या आहेत. तर एक हजार बसेस या खाजगी कंत्रटदाराकडून पुरविण्यात आलेल्या आहे. ही सगळी प्रक्रिया महामंडळाचे खासगीकरण करण्याची आहे. ती थांबली पाहिजे. ज्या कंपन्यांना खासगी कंत्राट दिले आहे. त्या कंपन्या या परप्रांतातील आहेत. एसटी महामंडळास मराठी कंत्राटदारही मिळत नाही, असाही मुद्दा पदाधिका-यांनी उपस्थित केला. ठाकरे यांनी सगळे मुद्दे ऐकून घेतल्यावर सांगण्यात आलेली माहिती सविस्तर द्या. त्याविषयी सरकारशी चर्चा करणार आहे. एसटी कामगारांच्या प्रश्नावर सरकारचा समाचार गुढी पाडव्याच्या सभेत घेणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.