विमानातील हवेचा दाब घटल्याने १६६ प्रवाशांचे प्राण आले कंठाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:49 AM2018-09-21T06:49:22+5:302018-09-21T06:50:46+5:30

मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातील हवेचा दाब गुरुवारी सकाळच्या प्रवासात कमी झाल्याने त्यातील १६६ प्रवासी आणि पाच कर्मचा-यांचे प्राण शब्दश: कंठाशी आले.

Reduction of the air pressure in the plane resulted in the death of 166 passengers | विमानातील हवेचा दाब घटल्याने १६६ प्रवाशांचे प्राण आले कंठाशी

विमानातील हवेचा दाब घटल्याने १६६ प्रवाशांचे प्राण आले कंठाशी

googlenewsNext

मुंबर्ई : मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातील हवेचा दाब गुरुवारी सकाळच्या प्रवासात कमी झाल्याने त्यातील १६६ प्रवासी आणि पाच कर्मचा-यांचे प्राण शब्दश: कंठाशी आले. ११ हजार फूट उंचीवर आणि ताशी सुमारे ७०० किमी वेगाने विमान जाताना हा थरारघडल्याने प्रवासी हादरले. यातील ३० प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्तस्राव सुरू झाल्याने वैमानिकाने विमान माघारी वळवून पुन्हा मुंबईत आणीबाणीच्या स्थितीत उतरवले.
हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आणि महिनाभरात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. जेट प्रशासनाने या घटनेची चौकशी होईपर्यंत या विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन आशिष शर्मा, फर्स्ट आॅफिसर अहमर खान यांच्याकडील विमान उड्डाणाची जबाबदारी काढून घेतली असून त्यांना तळावरील काम दिले आहे. डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत असून त्यात वैमानिक
दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे कंपनीने जाहीर केले.
जयपूरला जाणाºया ९ डब्ल्यू ६९७ या विमानाने सकाळी ५.५५ वाजता उड्डाण केल्यानंतर काही काळातच आधी विमानातील वातानुकूलन यंत्रणा बंद झाली. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हवेचा दाब अनियंत्रित होऊ लागला आणि प्रवाशांना गुदमरल्यासारखा त्रास होऊ लागला. नंतर त्वरित आॅक्सिजन मास्क खाली आले. पण प्रवासी घाबरले. तोवर काही प्रवाशांच्या नाकातून व कानातून रक्त येऊ लागल्याने परिस्थिती गंभीर बनली. विमानात गोंधळ उडाला. या वेळी विमान ११ हजार फूट उंचीवर होते आणि त्याचा वेग ताशी किमान ७०० किमी होता. विमानातील ही परिस्थिती लक्षात येताच ते तातडीने परत मुंबई विमानतळाकडे वळवण्यात आले. तोवर ते उमरगावपर्यंत गेले होते. तेथून ते दमण, वापीच्या हवाई हद्दीतून सिल्वासामार्गे पुन्हा मुंबईत सकाळी ७.१० वाजता परतले. विमानातील परिस्थितीची कल्पना आधीच देण्यात आल्याने विमानतळावर वैद्यकीय उपचारांची सोय करण्यात आली होती. ज्या पाच प्रवाशांना सर्वाधिक त्रास झाला, त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विमान जसजसे हवेत उंच जाऊ लागते, तेव्हा आतील हवेचा दाब कमी होऊ लागतो. तो नियंत्रित राहावा आणि श्वसनासाठी योग्य परिस्थिती राहावी यासाठी ((केबिन प्रेशर) दाब नियंत्रणाची विशिष्ट प्रणाली सुरू करावी लागते. नेमकी तीच सुरू नसल्याने १६६ प्रवाशांचा जीव गुदमरला. तेव्हा तत्काळ आॅक्सिजन मास्क सुरू नसते, तर ती गंभीर परिस्थिती झाली असती, असे म्हणणे प्रवाशांनी मांडले. मात्र हवेचा दाब कमी-जास्त होणे ही कंपनीची किंवा वैमानिकांची चूक नसून ती नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असलेली बाब आहे, असा दावा जेटने केला. ही घटना समजताच हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक विभागाच्या महासंचालकांना दिले.
>१७ जणांचा प्रवासास नकार
अन्वेषण राय, मुकेश शर्मा, विकास अग्रवाल, दामोदर दास, अंकूर काला या पाच प्रवाशांना अधिक त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी नानावटी रूग्णालयात नेण्यात आले. सायंकाळी त्यांना घरी पाठवण्यात आले. १६६ प्रवाशांपैकी १४४ जणांना जेटच्या दुसºया विमानातून जयपूरला पाठवण्यात आले. १७ प्रवाशांनी सध्या प्रवास करण्यास नकार दिल्याने ते नंतर प्रवास करतील किंवा त्यांना तिकिटाचे पैसे परत देण्यात येतील. या प्रकरणाची चौकशी डीजीसीए करणार आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जेट प्रशासनाने दिली आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
>पुरेशी माहिती न दिल्याचा प्रवाशांचा आरोप
विमानातील हवेचा दाब कमी झाल्यावर गुदमरू लागले. आॅक्सिजन मास्क खाली आले. मात्र विमानातील कोणत्याही केबिन क्रूने हे नेमके का घडते आहे, याची माहिती दिली नसल्याचा किंवा नेमकी काय परिस्थिती उद्भवली आहे, याची माहिती दिली नसल्याचा आरोप विमानतळावर उतरल्यावर प्रवाशांनी केला. आॅक्सिजन मास्क खाली येण्यापूर्वी हवेचा दाब कमी झाल्याबद्दलही विमानातील कर्मचाºयांनी काहीही सांगितले नाही. त्यामुळे प्रवासी घाबरले.
हा गोंधळ सुरू असतानाच काही मिनिटांतच विमान तातडीने उतरवण्यात येणार असल्याची उद््घोषणा करण्यात आली. मात्र विमान कोेणत्या तळावर उतरवण्यात येईल, याची माहिती त्यात नव्हती. एकूणच प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. विमान अपघात तपास विभागाकडून (एएआयबी) याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती डीजीसीएने दिली.
>जेटच्या विमानातील प्रवाशांच्या कानाला दुखापत
जेटच्या विमानातील ३० प्रवाशांच्या कानातून व नाकातून रक्त येऊ लागले. त्यातील पाच प्रवाशांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही काळ ऐकू येत नसल्याने हे प्रवासी घाबरले होते. रुग्णालयाचे चिफ आॅपरेटिंग आॅफिसर डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी सांगितले, पाच प्रवाशांना गुरुवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाक-कान-घसा तज्ज्ञांनी त्यांची तपासणी केली.हवेचा दाब अचानक कमी झाल्याने त्यांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्या कान-नाकातून रक्त येत होते. या रुग्णांची संपूर्ण तपासणी करण्यात आली. त्यांना आम्ही आठवडाभर विमानातून प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत फारसे घाबरण्यासारखे काहीही नसते. काही दिवसांत रुग्ण पूर्वस्थितीत येतो, अशी माहिती त्यांनी पुरवली.
>वैमानिकांना तूर्त शिक्षा
जेट प्रशासनाने चौकशी होईपर्यंत विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन आशिष शर्मा, फर्स्ट आॅफिसर अहमर खान यांच्याकडील विमान उड्डाणाची जबाबदारी काढून घेतली असून त्यांना तूर्त विमानतळावरील ड्युटी सोपवली आहे. या विमानात अक्षता, दिव्या, याम्की, हार्दिक व पल्लवी केबिन क्रू म्हणून कार्यरत होते. या वेळी त्यांनी प्रवाशांना कितपत मदत केली, याचीही चौकशी होणार आहे.

Web Title: Reduction of the air pressure in the plane resulted in the death of 166 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.