संभाजी ब्रिगेड मुंबईत २२७ जागा लढवणार
By admin | Published: January 25, 2017 05:10 AM2017-01-25T05:10:34+5:302017-01-25T05:10:34+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाणारा संभाजी ब्रिगेड हा विचार देणारा आणि कृती करणारा नवा पक्ष आहे. गेली ३० वर्षे समाजकारण केले
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाणारा संभाजी ब्रिगेड हा विचार देणारा आणि कृती करणारा नवा पक्ष आहे. गेली ३० वर्षे समाजकारण केले; आता संभाजी ब्रिगेड सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना बरोबर घेत चांगल्या पद्धतीने राजकरण करणार असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २२७ जागा लढविणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले यांनी दिली.
संभाजी ब्रिगेडचे नवनिर्वाचित मुंबई उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यातर्फे जोगेश्वरी पूर्वेकडील अस्मिता शाळेत सोमवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात सुधीर भोसले बोलत होते. मुंबईच्या विकासाची आमच्याकडे रेड प्रिंट असून, येत्या पालिका निवडणुकीत सर्व २२७ जागा लढणार असून, पक्षाची यादी आणि जाहीरनामा येत्या आठवड्यात जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या वेळी विविध पक्षांतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. तर गोरेगाव आणि जोगेश्वरीतील नवरात्र आणि गणेशोत्सव मंडळांचा गौरवही केला गेला. (प्रतिनिधी)