सिनेट निवडणूक : ‘पदवीधर’च्या यादीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 05:51 AM2018-01-31T05:51:04+5:302018-01-31T05:51:24+5:30
मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांसाठी विद्यापीठाने पदवीधर मतदार संघाच्या तात्पुरत्या मतदार याद्या विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केल्या, पण या मतदार यादीत मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. कारण एकाच्या नावासमोर दुसºयाचा फोटो, मुलाच्या नावासमोर मुलीचा फोटो असे प्रकार या याद्यांमध्ये आढळून आले आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांसाठी विद्यापीठाने पदवीधर मतदार संघाच्या तात्पुरत्या मतदार याद्या विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केल्या, पण या मतदार यादीत मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. कारण एकाच्या नावासमोर दुसºयाचा फोटो, मुलाच्या नावासमोर मुलीचा फोटो असे प्रकार या याद्यांमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठ वादात अडकण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुका जाहीर झाल्यापासून विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या आहेत. ७ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील निवडणूक जाहीर झाली आहे, पण महत्त्वाच्या पदवीधर मतदार संघ आणि प्राध्यापक मतदार संघ यांची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली नव्हती.
अखेर, ३० जानेवारीला पदवीधर मतदार यादी जाहीर करण्यात आली, पण यादीतही गोंधळ आढळून आला आहे, तसेच अनेक मतदारांना अवैध ठरविण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मतदार याद्या जाहीर केल्यावर मतदारांनी याद्या पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यात झालेला गोंधळ उघड झाला आहे.
मुंबई विद्यापीठाला सिनेट निवडणुकीची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत संपवायची आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया संपविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने कामकाज सुरू केले आहे, पण घाईत काम करतानाच विद्यापीठाकडून चुका होत
असल्याची टीका विद्यार्थी संघटना करीत आहे.
विद्यापीठाने अर्ज भरून घेतले, तरीही नाव आणि फोटो चुकविले आहेत. मतदार यादीत तब्बल ६० हजार मतदारांची नावे आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या प्रत्येकाने नाव, फोटो आणि अन्य माहिती संकेतस्थळावरून
तपासून घ्यावी, असे आवाहन माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केले आहे.
१२ फेब्रुवारीपर्यंत अपील
३ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदार यादीविषयी आक्षेप नोंदविता येणार आहेत. दुसरी मतदार यादी ८ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे, तर कुलगुरूंकडे १२ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत अपील करता येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.