काँग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 03:58 PM2024-04-22T15:58:13+5:302024-04-22T16:00:01+5:30

अजित पवार आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अंतुले यांचं राष्ट्रवादीत स्वागत करण्यात आलं.

set back for Congress Former MLA Mushtaq Antule joins Ajit Pawars NCP | काँग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

काँग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

Congress Ex MLA ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अंतुले यांचं राष्ट्रवादीत स्वागत करण्यात आलं.

राष्ट्रवादीत प्रवेश करताना मुश्ताक अंतुले यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्रात अजितदादांच्या रुपानं विकास करण्याची एक शक्ती उभी राहिली आहे आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला."  यावेळी मुश्ताक अंतुले यांनी सुनील तटकरेंवरही स्तुतीसुमने उधळली आहेत. "अनेक वर्ष मी सुनील तटकरे यांचं काम पाहतोय. अंतुले साहेबांनी ज्या योजना आखल्या होत्या त्या सुनील तटकरे पूर्ण करत आहेत. अंतुले साहेबांसारखीच कामाची धमक तटकरे यांच्यामध्ये लोक पाहत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेच विजयी होणार आहेत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, "मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेकजण आपल्या विचारांसोबत येत आहेत याचा अर्थ अजितदादांनी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय धर्मनिरपेक्ष विचारापासून अजिबात ढळलेला नाही हे सिद्ध होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अल्पसंख्याक समाज नाराज असे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन पक्ष काम करत आहे हे सुनील तटकरे यांनी सांगितले.  

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश सरचिटणीस  शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली  चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, वाय. बी. त्रिवेदी, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: set back for Congress Former MLA Mushtaq Antule joins Ajit Pawars NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.