'राजाला साथ द्या'... शरद पवारांनी पुन्हा एकदा घडवून आणला उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा तह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 02:48 PM2019-03-09T14:48:37+5:302019-03-09T14:49:52+5:30

उदयनराजे भोसले यांनी पाच वर्षांत पक्षाच्या वाढीसाठी कोणतेच काम केले नसल्याचा आरोप पक्षाच्याच काही आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याने उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय अद्यापही व्हायचा आहे.

shivendraraja and udayanraje meet in mumbai, sharad pawar compromise on issue | 'राजाला साथ द्या'... शरद पवारांनी पुन्हा एकदा घडवून आणला उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा तह

'राजाला साथ द्या'... शरद पवारांनी पुन्हा एकदा घडवून आणला उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा तह

Next

सातारा  - उदयनराजे भोसलेंचा सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वादामुळे यंदा राष्ट्रवादीकडून कोणाला तिकीट मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच शनिवारी मुंबईत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात तह घडवून आणला आहे. तर, आमच्यात कुठलाही वाद नसल्याचं उदयनराजेंनी स्पष्ट केलंय.

उदयनराजे भोसले यांनी पाच वर्षांत पक्षाच्या वाढीसाठी कोणतेच काम केले नसल्याचा आरोप पक्षाच्याच काही आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याने उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय अद्यापही व्हायचा आहे. कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली तरी निवडून येण्याच्या दृष्टीने खासदार उदयनराजे भोसले यांनी तयारी केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि त्याविरोधात असलेल्या गटांच्याही त्यांनीभेटी घेतल्या आहेत. पक्ष कोणताही असला तरी उदयनराजे निवडून येणार असा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास असल्यामुळे भाजपह, आरपीआय यांनी उदयनराजेंनी आपल्या पक्षात यावे यासाठी पायघड्या घातल्या आहेत. मात्र, जोपर्यंत शरद पवार अंतिम निर्णय देणार नाहीत तोपर्यंत उदयनराजेही कोणत्या पक्षात जायचे याबाबतचा अंतिम निर्णय फायनल घेणार नाहीत. त्यातच, आज उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंची मुंबईत पवारांसमवेत बैठक झाली. त्यामुळे या बैठकीनंतर दोन्ही राजांची दिलजमाई झाली असून आमच्यात कुठलाही वाद नसल्याचं खुद्द उदयनराजेंनीच स्पष्ट केलं आहे. 

किरकोळ वाद विवाद हे वाद नसतात. कार्यकर्त्यांमुळे काही गैरसमज होते. या बैठकीत राज्यातील इतर मतदारसंघांबाबतही चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे केवळ साताराच नव्हे, तर राज्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याने आम्ही इथपर्यंत आलो, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा वाद मिटून उदयनराजेंच्या उमेदवारी शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना उमेदवारी दिली नाही तर त्या पक्षाकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे असे तीन पर्याय तयार आहेत.

2009 साली शिवसेनेने पुरूषोत्तम जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, 2014 मध्ये हा मतदारसंघ आरपीआयच्या वाट्याला गेल्यामुळे पुरूषोत्तम जाधव यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. तर आरपीआयने अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली. यावेळीही पुरूषोत्तम जाधव लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, अपक्ष लढणार की पक्षाच्या तिकिटावर हे अजूनही निश्चित झालेले नाही. त्याबरोबरच भाजपकडून आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून यावेळी स्वातंत्र्यसैनिक किसन वीर यांचे नातू शैलेंद्र वीर यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर भाजप, शिवसेना, आरपीआय यांच्या युतीमध्ये हा मतदारसंघ आरपीआयच्या वाट्याला आला आहे. मात्र, उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर हा मतदारसंघ भाजप स्वत:साठी मागू शकते. या मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा हे विधानसभा मतदारसंघ येतात. राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना उमेदवारी मिळाली तर आमदारांचे सहकार्य मिळणार का आणि नंतर उदयनराजेंची मदत होणार का हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे.

Web Title: shivendraraja and udayanraje meet in mumbai, sharad pawar compromise on issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.