स्कायवॉक आणि पुलाविना परवड, जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 07:00 AM2017-10-23T07:00:46+5:302017-10-23T07:01:18+5:30
मुंबईचे पूर्वकडील टोक असलेल्या आणि झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या मानखुर्द रेल्वे स्थानकाचा विकास अत्यंत धिम्या गतीने होत आहे.
अक्षय चोरगे
मुंबई : मुंबईचे पूर्वकडील टोक असलेल्या आणि झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या मानखुर्द रेल्वे स्थानकाचा विकास अत्यंत धिम्या गतीने होत आहे. रेल्वे स्थानकावर येण्यासाठी मानखुर्दमधील आगरवाडी, लल्लूभाई कंपाउंड, जयहिंदनगर, सोनापूर, साठेनगर शिवाजीनगर परिसरात राहणारे लोक जीव धोक्यात घालून, रेल्वे रूळ ओलांडत रेल्वे स्थानकावर पोहोचतात. या लोकांसाठी स्कायवॉक आणि पूल बांधावा, अशी रहिवासी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी आहे. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
मानखुर्द हे रेल्वे स्थानक प्रशस्त असले, तरी येथील लोकसंख्येच्या दृष्टीने ते अपुरेच असल्याची प्रतिक्रिया येथील प्रवाशांनी दिली. रेल्वे स्थानक परिसरात ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी घातलेला हैदोस येथील प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. रेल्वे स्थानकाबाहेर जाणाºया मार्गावर वाहनांसाठी पार्किंग तयार केले आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना अडथळा निर्माण होतो.
मानखुर्द रेल्वे स्थानकाचा फलाट क्रमांक ३ हा फलाट क्रमांक १ व २ पासून दूर अंतरावर आहेत. हार्बर रेल्वेचा विस्तार केल्यानंतर फलाट क्रमांक ३चा वापर हळूहळू कमी होऊ लागला. सध्या या फलाटावर दररोज सकाळी एकच लोकल थांबते. ती लोकल गेल्यानंतर दिवसभर या फलाटावर गर्दुल्ले आणि जुगाºयांचे राज्य असते. विशेष म्हणजे, या फलाटाच्या समोरच रेल्वे पालिसांची चौकी असून, रेल्वे पोलीस गर्दुल्ल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
तिकीट घर
मानखुर्द येथे दोन तिकीट घरे होती. नुकतेच रेल्वे स्थानकात तिसरे तिकीट घर तयार केले, परंतु या तिकीट घराची फक्त एकच तिकीट खिडकी चालू करण्यात आली
आहे. सकाळी तीन ते चार तास ही तिकीट खिडकी चालू असते. त्यामुळे तिकीट घर असून अडचण नसून खोळंबा, अशी प्रवाशांची अवस्था झाली आहे.
>महाराष्ट्रनगरसाठी निमुळता रस्ता
महाराष्ट्रनगरमधील हजारो प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी फक्त एकच निमुळती पायवाट आहे. एका वेळी दोन-तीन पादचारीच चालू शकतात. सकाळी व सायंकाळच्या वेळेत या वाटेवर अनेकदा धक्काबुक्की आणि त्यातून मारहाणीचे प्रसंग घडले आहेत. अर्ध्या किलोमीटरहून मोठ्या असलेल्या या वाटेवर एकही पथदिवा नसल्याने समाजकंटक रात्रीच्या वेळी संधीचा फायदा घेतात.
>जीव धोक्यात
मानखुर्दमधील नूतन विद्यामंदिर, मातोश्री विद्यामंदिर, कुमुद विद्यामंदिर, पडुआ हायस्कूल आणि मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी रेल्वे पटरीतून चालत जातात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कायवॉक अथवा किमान रेल्वेपटरी ओलांडण्यासाठी पादचारी पूल उभारावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
>फलाटावर कचरा जाळला जातो
मानखुर्द स्थानकावर सफाई कर्मचारी गोळा केलेला कचरा फलाट क्रमांक २ वरच जाळतात. यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, मोठ्या प्रमाणात असतात. याच्या धुरापासून स्वत:ला वाचण्यासाठी प्रवासी नाकार रुमाल धरून रेल्वेची वाट पाहातात.
>फेरीवाल्यांचा मनस्ताप
मानखुर्द स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरून बाहेर जाणाºया मार्गावरच फेरीवाले ठाण मांडून बसतात. सायंकाळी घरी जाणाºया प्रवाशांना फेरीवाल्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांना वाट काढत बाहेर पडावे लागते. मागील आठवड्यात हे प्रमाण खूप कमी झाले होते, परंतु शनिवारपासून फेरीवाले परत आले आहेत.
>सूचना, तक्रारी, व्हिडीओ
‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ºहास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास
८८४७७४१३०१
या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.
>महाराष्टÑनगरकडे ये-जा करण्यासाठी असलेली पायवाट रुंद करण्यात यावी, वाटेवर पथदिवे असावेत, अथवा महाराष्टÑनगर ते मानखुर्द स्थानकादरम्यान स्कायवॉक उभारावा. रेल्वे स्थानकावर सुरू केलेले नवे तिकीट घर पूर्ण वेळ चालू ठेवावे.
- कोमल खलाटे, प्रवासी
>मानखुर्द रेल्वे स्थानकाचा वापर करणाºया प्रवाशांची संख्या अफाट असल्याने स्थानकाचा पुनर्विकास अत्यावश्यक आहे, त्यासंबधी रेल्वेकडे मी सातत्याने मागणी करत आहे. लल्लूभाई कंपाउंड, जयहिंदनगर, सोनापूर, साठेनगर परिसरातील रहिवासी रेल्वेच्या रूळांतून ये-जा करतात, अशा प्रवाशांसाठी स्कायवॉकची मागणी केली आहे. पाठपुरावा करून लवकरच मानखुर्दकरांच्या सोयीसाठी स्कायवॉक उभारणार आहोत. मातोश्री विद्यामंदिर, नूतन विद्यामंदिर, कुमुद विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जयहिंदनगर नाल्यावर पूल उभारण्याची मागणीसुद्धा केलेली आहे. - राहुल शेवाळे, खासदार
>फलाट क्रमांक १वरून बाहेर जाण्यासाठी असलेल्या दुसºया एक्झिट गेटसमोर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे त्या गेटचा वापर अनेकदा होत नाही. पहिल्या एक्झिट गेटसमोर फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात. त्यांना तेथून हटविणे गरजेचे आहे.
- शुभम भापकर, प्रवासी
>मानखुर्द स्थानक परिसरातील फेरीवाले हटविणे आवश्यक आहे, तसेच स्थानकाबाहेरील पार्किंगमुळेही प्रवाशांना ये-जा करण्यात अडचणी येतात. पार्किंगसाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी आणि फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
- प्रशांत पाटील, प्रवासी
>रेल्वेने सरसकट सर्वच रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले हटविणे गरजेचे आहे. त्यासोबतच फेरीवाल्यांडून प्रवाशांनी कोणत्याही प्रकारचे साहित्य खरेदी करू नये. तसे झाल्यास फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविणे सोपे जाईल. अनेक रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांवर गर्दीचे नियोजन करता यावे, यासाठी पादचारी पुलांवर दुभाजक असावेत.
- भालचंद्र संसारे, प्रवासी